
बुलडाणा। Buldana । प्रतिनिधी
राज्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमवला आहे. या पाणीटंचाईमुळे अशीच एक भीषण आणि ताजी घटना समोर आली आहे. ज्यांच्याकडे राज्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे, त्या गुलाबराव पाटलांच्या पालकत्वाखाली असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे एका आठ वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकर्यांनी रास्ता रोको करत प्रशासनाला धारेवर धरल्याने वातावरण ढवळून निघाले होते.
बुलडाणा नजीकच्या देऊळघाट येथील एक मुलगी खोल विहिरीत पडली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. या आठ वर्षीय जखमी मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईक आणि गावकर्यांनी आज रास्ता रोको करत प्रशासन व ग्रामपंचायतीविरोधात रोष व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बुलडाणा पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या गावात तणाव निर्माण झाला आहे. या रास्ता रोकोमुळे बुलडाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. अंजली भरत शेजोळ (वय 8) असे मृत मुलीचे नाव आहे. धनगरवाडी परिसरात असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी ती गेली होती. यावेळी तोल जाऊन अंजली विहिरीत पडली.
यात गंभीर जखमी झालेल्या अंजलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको करत अजिंठा राज्य मार्गावरील वाहतूक रोखली. या सर्वांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. पोलीस आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचार्यांनी आंदोलकांशी चर्चा करत समजवण्याचा प्रयत्न केला.