बांबूंच्या कामट्यांचे आकाशकंदील

बांबूंच्या कामट्यांचे आकाशकंदील

किरण पाटील आवारे

दिवाळी हा ग्रामसंस्कृतीतील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाच सहा दिवस चालणारा सगळ्यात महत्वाचा सण. या सणाला शाळेला सुट्टी असायची. मग सुट्टीत मामाच्या गावाला जायची ओढ लागायची. शाळेला गणवेश असा नव्हताच त्यामुळे दिवाळी शिवाय नवे कपडे बघायला मिळत नसत. घरी आर्थिक चणचण असली तरी मामा बहीण,भाच्यांना नवे कपडे घेतल्याशिवाय राहत नसे.रेडिमेड कपड्यांची तेव्हा फॅशन नव्हती. त्यामुळे मामाच्या गावाला जमा झालेल्या भावंडांना, मावस भावंडांना एकच ताग्यातून कापड फाडून आणलेले असायचे. त्यामुळे सर्वच भावंडे नवे कपडे घातले की,बँड पार्टीसारखे दिसत असत. टेलरिंग व्यवसायाला तेव्हा भरभराटीचे दिवस होते. त्यामुळे त्यांच्याकडे गर्दी असायची. पोरांना नव्या कपड्यांचे मोठे कुतुहुल,त्यामुळे पोरांचे टेलरकडे दिवसभरात चार पाच चक्कर हमखास व्हायचे. वाटून दिलेले फटाके पोरं लपवून ठेवायचे. दुसऱ्या कुणाच्या हाती लागले तर तो काही फटाकडे चोरायचा आणि ज्याचे चोरले त्याच्या लक्ष्यात आले तर तो बोंब ठोकायचा.ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची त्यांना फटाके कमी मिळायचे त्यामुळे दुसऱ्या दिवशी श्रीमंतांच्या दारात त्यांच्या पोरांनी उडवलेले,त्यातून काही फुस्स गेलेले फटाके गोळा करून आणायचे. वाजले तर ठीक नाहीतर त्यातून दारू काढून कागदावर पेटवण्याचा असफल प्रयत्न करायचा.

घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले पणत्या दिवे लावले जायचे.उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जायचा.तेव्हा रेडिमेड आकाशकंदिलाची फॅशन नव्हतीच.पोरं रंगीत कागद,खारी माती,आणि बांबूंच्या कामट्यांच्या सहाय्याने आकाशकंदील बनवायचे. त्यात पणती किंवा दिवा ठेवला जायचा.घराबाहेर शेणाचा सडा पडायचा,अंगण रांगोळीने सुशोभित व्हायचे. घरात महिलावर्गाची रव्याचे लाडू,करंज्या,शेव,चिवडा,अनारसे बनविण्याची लगबग असायची. देवाला नैवैद्य न दाखवताच पदार्थ चांगले झाले की नाही त्याची टेस्टिंग पोरांकडे असायची. दिवाळी सोडून इतर वेळेस हे पदार्थ मिळत नव्हते.आठ आण्यात पोटभर खाऊ यायचा मात्र आठ आणे बघायला देखील मिळत नव्हते.

वसुबारस

'दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी',म्हणत दिवाळीची सुरवात वसूबारसने व्हायची.आश्विन कृष्ण द्वादशीस,म्हणजेच गोवत्सद्वादशीस,वसुबारस हा सण साजरा केला जातो.वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने ज्यांच्याकडे घरी गुरे,वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी गोड धोड पुरणाचा स्वयंपाक करतात.घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू,फुले,अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालून पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.

धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात.याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात.लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात.कडुनिंब सर्वरोग नाशक असल्याने कडुनिंबाचे खूप महत्त्व आहे,म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात.उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात.कुबेर,विष्णू,लक्ष्मी, योगिनी,गणेश,नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.

नरक चतुर्दशी

या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे.या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले.कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते.सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून,सुवासिक उटणे लावून,सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.या दिवशी पहाटे यमासाठी नरकात,म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते,तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो.

लक्ष्मी पूजन

लक्ष्मी धनाची देवता.लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर धन,धान्य यांची विपूलता येते.त्यामुळे लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मी प्रसन्न करण्याचा लक्ष्मीपूजन हा सण.ग्रामीण भागात लक्ष्मीपूजनाला शिराई अर्थात केरसुणीला अनन्यसाधारण महत्व आहे.ग्रामीण तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे,हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे,लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून,स्थिर लग्नावर करतात.त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे.

अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात.पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात.त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात.त्यात सोन्याचे दागिने,चांदीचा रुपया,दागिने,पैसे ठेवून त्यांची पूजा करतात.प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती.कुबेर हे देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानले जातात. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्यांची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता.परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली.

दिवाळी पाडवा

पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे.या शेणाला "शुभा" असे म्हणतात.असा हा लोककल्याणकारी राजा बळी,त्याच्या पूजनाचा बलिप्रतिपदा हा दिवस.या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नीक पतीला औक्षण करते व पती पत्नीबला ओवाळणी घालतो.नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीळच्या माहेरी साजरी करतात.ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात.

बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचीही प्रथा आहे.ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात.अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय.प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे.पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

भाऊबीज

भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.त्यात भाऊबीज हा दिवाळीतील सर्वात महत्वाचा सण आहे.दिवाळीची सांगता भाऊबीजनेच होते.कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते.सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते.भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.

9423086021

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com