औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद महापालिका आता शहरात स्वत:चे सहा पेट्रोल पंप उभारणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, पेट्रोल पंप उभारण्याबद्दल ऑइल कंपन्यांशी महापालिका प्रशासनाची बोलणी सुरू आहे. सहापैकी मध्यवर्ती जकात नाक्याजवळ एका पेट्रोलपंपाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून प्रशासनातर्फे विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेचे स्वत:चे पेट्रोलपंप असतील तर उत्पनाच्या स्त्रोतांमध्ये भर पडेल, अशी कल्पना प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मांडली आणि त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले.

ऑइल कंपनीच्या सहकार्याने पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. पंप उभारण्यासाठीची जागा महापालिकेची, पंपावरील काही कर्मचारी महापालिकेचे. पंपासाठीच्या जागेचे भाडे ऑइल कंपनी महापालिकेला देणार, त्याशिवाय कंपनीच्या दराने महापालिकेच्या वाहनांना इंधनाचा पुरवठा केला जाणार. खासगी वाहनांना मात्र व्यावसायिक दराने इंधन पुरवठा करण्याचे महापालिकेने निश्चित केलेल्या आपल्या धोरणात नमूद करण्यात आले आहे.

मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल - सावंगी नाका, कांचनवाडी, दुग्धनगरी, गायमुखचा परिसर आणि गरवारे स्टेडियम या सहा ठिकाणी पेट्रोल पंपांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी मध्यवर्ती जकात नाका जवळील जागेवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला पंप उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या कंपनीला पोलिस आयुक्तालयाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळाले आहे, महावितरणसह अन्य काही 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. प्रमाणपत्र मिळाल्यावर महापालिका त्या कंपनीबरोबर 'लीज ऍग्रीमेंट' करणार आहे. त्यानंतर पंप उभारणीचे काम सुरू होईल.