दिलासादायक... औरंगाबादचा रिकव्हरी रेट ९४ टक्के

शहरवासीयांसह आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा
दिलासादायक... औरंगाबादचा रिकव्हरी रेट ९४ टक्के

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने मागील दीड महिन्यात शहरात चांगलेच थैमान घातले होते. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून रोज नव्याने आढळणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पूर्वी हजारच्या घरांत असणारी रोजची रुग्णांची संख्या ही आता तीनशे ते चारशेवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही 94 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामुळे शहरवासीयांसह आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिन्यात तर कोरोनाचा उद्र्ेक झाला. रोजची सुमारे नऊशे ते हजार बाधितांची संख्या निघू लागल्याने चिंता वाढली होती. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मृत्युदरही अधिक दिसून आल्याने बरे होण्याचे प्रमाण अर्थातच रिकव्हरी रेट हा तब्बल 79 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने मृत्युदर उंचावला होता.

दरम्यान, रोज गतीने वाढत जाणार्‍या रुग्णसंख्येमुळे शहरात सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील बेड्सही रुग्णांनी हाऊसफुल झाले होते. परिणामी, नव्याने आढळणार्‍या अनेक रुग्णांना बेड्ससाठी शोधाशोध करावी लागून परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मात्र प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे महिनाभरात वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. साधारणतः 21 एप्रिलपासून शहरात रोज नव्याने आढळणार्‍या रूग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. दुसरीकडे गत महिन्यात 79 टक्क्यांपर्यंत खालावलेला रिकव्हरी रेटही आता वाढला आहे. पालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार, मंगळवारी दि.4 मे रोजी शहराचा रिकव्हरी रेट 94.07 टक्के एवढा नोंदला गेला. ही बाब शहराला दिलासा देणारी मानली जात असून आरोग्य यंत्रणेवरील ताणही यामुळे कमी झाला आहे.

मार्च व एप्रिलच्या महिन्याच्या प्रारंभी 25 ते 33 टक्क्यापर्यंत वाढत गेलेला कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा आता 10 ते 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. आजघडीला शंभर कोरोना चाचण्यांमागे 10 ते 12 जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. मंगळवारी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 10.35 टक्के नोंदवला गेला.

शहरात रुग्णांचा घटता आलेख

तारीख व आढळलेले रुग्ण

25 एप्रिल 470

26 एप्रिल 497

27 एप्रिल 504

28 एप्रिल 530

29 एप्रिल 456

30 एप्रिल 429

01 मे 482

02 मे 373

03 मे 320

04 मे 374

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com