खूशखबर... औरंगाबादला मिळणार दोन मेट्रो लाईन

पाच हजार कोटींचा प्रकल्प 
खूशखबर... औरंगाबादला मिळणार दोन मेट्रो लाईन

औरंगाबाद - aurangabad

मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील विकासात आणखी एक महत्त्वाची भर पडणार असून, वाळूज ते शेंद्रा आणि बिडकीन ते हर्सूल या मुख्य मार्गावर मेट्रो रेल्वे (Metro Railway) आणि फ्लायओव्हर बनविण्यासाठी रेल्वे कार्पोरेशन अर्थात मेट्रोच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात काम सुरू होत आहे. हे दोन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून, डबल डेकर पूल आणि मेट्रोची सोबतच पायाभरणी व्हावी, या अनुषंगाने मंगळवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad) यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

पहिला मार्गतील शेंद्रा ते पंढरपूर या मेट्रो मार्गात चिकलठाणा, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप ते पंढरपूर असा मार्ग प्रस्तावित केला आहे. तर दुसरा प्रस्तावित मार्ग बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद रेल्वे स्टेशन, बस स्थानक ते हर्सूल असा आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चिकलठाणा ते वाळूज सलग एक ओव्हर ब्रिज बनविण्यासंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून डी.पी.आर. तयार करण्यासंदर्भात काम झाले आहे.

रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा (कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचा आढावा डॉ. कराड यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी महापालिका आणि महामेट्रो कंपनी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद शहरात डबल डेकर पूल बनवून मेट्रोचे काम करावे, यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी व नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे दिल्लीत जाऊन प्रस्ताव सादर केला जाईल, असेही डॉ. कराड म्हणाले.

डबल डेकर पूल

या प्रकल्पांतर्गत शहरात डबल डेकर पूल बांधून त्यावर मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी नागपूरमध्ये अशाच पद्धतीचे डबल डेकर पूल उभारण्यात आले आहेत.

दोन्ही औद्योगिक वसाहती जोडल्या जातील

पहिला पूल रस्ते वाहतुकीसाठी तर त्यावरील दुसरा पूल मेट्रोसाठी उभारण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकत्र झाले तर किमान एक हजार कोटी रुपये खर्च वाचेल.

शेंद्रा ते पंढरपूर

शेंद्रा-चिकलठाणा-क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप ते पंढरपूर. या मेट्रोमुळे शेंद्रा-वाळूज एमआयडीसी जोडली जाणार

बिडकीन ते हर्सूल

बिडकीन-पैठण रोड- मुख्य रेल्वे स्टेशन- मध्यवर्ती बसस्थानक- हर्सूल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com