औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या कारभाराचे होणार ‘ऑडिट’ 

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केलेल्या कारभाराचे ऑडिट करा, असे पत्र नागपूर येथील महालेखापालांच्या (एजी ऑफिस) कार्यालयाला पाठवणार असून ऑडिट करण्यासाठी या कार्यालयाकडे पाठपुरावा करणार आहोत, असे नवनियुक्त सीईओ बाबासाहेब मनोहरे यांनी नमूद केले. सीईओंच्या पहिल्याच दणक्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बाबासाहेब मनोहरे रुजू झाले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली. मनोहरे म्हणाले, ‘स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बरीच कामे झाली आहेत, काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामांचे नियोजन झाले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आतापर्यंत सुमारे ४४१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ३०० कोटी रुपयांची कामे झाल्याचे लक्षात आले आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या खर्चाचे ऑडिट नागपूर येथील एजी कार्यालयाने करावे असे पत्र मी लिहिणार आहे, त्यानंतर पाठपुरावाही करणार आहे. अंतर्गत ऑडिट झाले आहे, पण ‘एजी’ कार्यालयाकडून ऑडिट होणे गरजेचे आहे.’

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी महापालिकेने स्वहिस्सा म्हणून २५० कोटी रुपये देणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेने अद्याप स्वहिश्श्यापोटी काहीच रक्कम दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेने आपल्या हिश्श्याची रक्कम लवकरात लवकर द्यावी यासाठी देखील पालिका आयुक्तांना विनंती करणार असल्याचे मनोहरे यांनी सांगितले. महापालिकेने पैसे दिले तर कामे गतीने होतील, शासनाचा उर्वरित निधी देखील मिळेल, असे मनोहरे म्हणाले. पालिकेने टप्प्या-टप्प्याने पैसे दिले तरी चालतील, मात्र, पैसे देणे पालिकेने सुरू केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *