औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेला मुदतवाढ मिळणार?

औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेला मुदतवाढ मिळणार?

२०६ कोटी रुपये मिळणे बाकी

औरंगाबाद - Aurangabad

स्मार्ट सिटी योजनेला मुदतवाढ मिळालेली नसून, अशी मुदतवाढ मिळण्याची शक्यतादेखील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये निधी मिळेपर्यंत स्मार्ट सिटीची योजना सुरू राहणार आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर २०१४-१५ मध्ये केंद्र सरकारने देशभरात स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. ही योजना पाच वर्षांसाठी असेल असे स्पष्ट करण्यात आले. या योजनेसाठी निवडण्यात येणाऱ्या शहरात विकासकामे करण्यासाठी एक हजार कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली. यापैकी पाचशे कोटी रुपये केंद्र सरकार देणार असून, राज्य सरकार आणि शहराशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी २५० कोटी रुपये देईल, असे जाहीर करण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेसाठी देशभरातील ९९ शहरांची निवड करण्यात आली होती.

या योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश दुसऱ्या फेरीत जून २०१६ मध्ये झाला. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यामुळे शहरात एक हजार कोटींची विकासकामे होतील असे गृहीत धरण्यात आले आणि त्यानुसार कामांचे नियोजनदेखील करण्यात आले. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना पाच वर्षांचीच असल्यामुळे जून २०२१च्या अखेरीस या योजनेची मुदत संपत आहे.

मुदतवाढीबद्दल सरकारकडून काही निर्देश आले आहेत का, याबद्दल औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'ही योजना पाच वर्षांचीच असल्यामुळे मुदतवाढीबद्दल सरकारने काहीही कळवलेले नाही. या योजनेसाठी केंद्र सरकार पाचशे कोटी रुपये देणार आहे. पाचशे कोटींपैकी आतापर्यंत २९४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, २०६ कोटी रुपये मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने २५० कोटींपैकी १४७ कोटी रुपये स्मार्ट सिटी योजनेसाठी दिले आहेत, १०३ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणे बाकी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून संपूर्ण निधी प्राप्त होईपर्यंत स्मार्ट सिटी योजनेचे काम सुरू राहील.'

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com