70 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्यावरच औरंगाबाद 'सेफ'!

शहर अद्यापही डेंजर झोनमध्येच
70 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्यावरच औरंगाबाद 'सेफ'!

औरंगाबाद - Aurangabad

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र तरीही शहर अजूनही डेंजर झोनमध्येच आहे. शहरातील 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होत नाही किंवा त्यांच्यात अँटिबॉडीज निर्माण होत नाहीत, तोवर शहर सुरक्षिततेच्या परिघात येणार नाही, असे मत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केले.

पालिका आयुक्‍त पांडेय यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मागील आठवडाभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी व करोनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची आकडेवारी माध्यमांसमोर सादर केली. लॉकडाऊन, लसीकरण आणि स्वयंशिस्त या तीन घटकांमुळे शहराची स्थिती कोरोनाबाधितांच्या बाबतीत नियंत्रणात आहे, असे वाटत असले तरी मृतांची संख्या लक्षात घेता शहर अद्यापही डेंडर झोनमध्येच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद शहराची लोकसंख्या अंदाजे सतरा लाख आहे. या लोकसंख्येच्या सत्तर टक्के नागरिकांचे लसीकरण झाले, त्यांच्यात अँटिबॉडीज निर्माण झाल्या तरच आपले शहर सुरक्षिततेच्या परिघात येऊ शकेल. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी औरंगाबाद शहरात सिरो सर्वेक्षण केले. त्यात 17 टक्के लोकांमध्येच अँटिबॉडीज आढळून आल्या, सप्टेबर ते जानेवारी दरम्यान ज्यांना कोरोनाची लागण झाली त्याव्यक्तींमध्ये देखील आता अँटिबॉडिज निर्माण झालेल्या आहेत, हे प्रमाण सुमारे वीस टक्के आहे. शहरात तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे, हे प्रमाण देखील वीस टक्के आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान दहा टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांच्यात अँडिबॉडिज् निर्माण झाल्या आहेत. अँटिबॉडिज् शरीरात जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत राहू शकतात. त्यामुळे सिरो सर्वेक्षणात ज्या सतरा टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडिज् आढळून आल्या, त्यांचा सहा महिन्याचा कालावधी आता संपत आहे. त्यामुळे अशा व्यक्‍तींचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्‍त पांडेय यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 15 मे रोजी शहरात 203 रुग्ण होते, तर आठ जणांचा मृत्यू झाला होता. 16 मे रोजी 206 रुगण होते, आठ जणांचा मृत्यू झाला होता. 17 मे रोजी 172 रुग्ण होते, पाच जणांचा मृत्यू झाला होता. 18 मे रोजी 174 रुग्ण होते, मृतांची संख्या पाच होती. 19 मे रोजी 214 रुग्ण आढळून आले, पाच जणांचा मृत्यू झाला. 20 मे रोजी 190 रुग्ण होते, दहा जणांचा मृत्यू झाला होता. 21 मे रोजी 148 रुग्ण होते, सात जणांचा मृत्यू झाला होता. 22 मे रोजी 136 रुग्ण आणि सहा जणांचा मृत्यू, 23 मे रोजी 124 रुग्ण आणि नऊ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाण रोज सरासरी दहा आहे, असे पांडेय यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com