<p><strong>औरंगाबाद - Aurangabad</strong></p><p>जगभरात खळबळ उडवणाऱ्या कोरोना संसर्गकाळात सर्वसामान्य नागरिक आपल्या खर्चांवर अंकुश आणत असताना औरंगाबाद महानगरपालिकेने आपल्या टास्कफोर्सच्या कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलिंगवर तब्बल ६२ लाखांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एकीकडे निधीअभावी विकासकामे थांबवलेली असताना इतका मोठा खर्च झाल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी एप्रिलमध्ये संपला असल्याने सध्या सर्व कामे प्रशासकीय मंडळींच्याच हातात आहे.</p>. <p>औरंगाबादमध्ये मार्च २०२०मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत गेली. मे, जून, जुलै, ऑगस्ट असे चार महिने करोनामुळे औरंगाबादकरांसाठी कठीण ठरले. प्रामुख्याने जुलै-ऑगस्ट महिन्यात शहरात करोनाचा उद्रेक झाला. कोव्हिड केअर सेंटर, खासगी व सरकारी दवाखाने हाउसफुल्ल झाले. ऑक्सिजन बेडचा प्रश्नदेखील निर्माण झाला. या काळात महापालिकेने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंटचे काम युद्धपातळीवर केले. त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. शहराच्या एंट्रीपॉइंटवर सुमारे दीड महिना दिवसाचे २४ तास बाहेरगावहून येणाऱ्यांची करोना चाचणी केली जात होती. त्याशिवाय टास्क फोर्स, कंटेन्मेंट झोनसाठीच्या विषेष पथकांचे काम सुरू होते. या कामात प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी, दंतरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. हे कर्मचारी काम करून घरी गेले, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या सर्व कर्मचाऱ्यांची शहरात चार हॉटेलांमध्ये राहण्याची , जेवणाची, नाष्ट्याची व्यवस्था केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ते दीड महिने या कर्मचाऱ्यांचा मुक्काम हॉटेलात होता. या काळात तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये महापालिकेने हॉटेलच्या बिलापोटी मोजले. या खर्चाला १९ मार्च २०२१ रोजी मंजुरीही देण्यात आली. कोरोना काळात हॉटेलवर एवढा खर्च करण्यात आल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.</p>