कौतुकास्पद... औरंगाबाद महानगरपालिका सुरू करणार सीबीएसई शाळा

सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण
कौतुकास्पद... औरंगाबाद महानगरपालिका सुरू करणार सीबीएसई शाळा

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाच्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. या परिस्थितीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अवाजवी शुल्क भरणे त्यांच्यासाठी अवघड आहे. अशा पालकांची अडचण लक्षात घेत महापालिकेच्या शिक्षक विभागाने सीबीएसई (CBSE) माध्यमांच्या दोन शाळांसह आठ इंग्रजी शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मोफत मिळेल, अशी माहिती महानगरपालिका (Municipal Corporation) शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली.  

शहरात महानगरपालिकेच्या एकूण 72 शाळा आहेत त्यात सुमारे 12 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील 48 शाळा या मराठी, सहा व्दिभाषीक आणि 18 उर्दु माध्यमांच्या आहेत. यातील 11 केंद्रीय शाळा तर 17 शाळा या माध्यमिक आहेत. यासाठी 412 शिक्षकांची नेमणुक केली आहे. 141 बालताई या सध्या कार्यरत आहेत. 51 शिक्षक माध्यमिक विभागासाठी काम करतात. त्यातच आता पालिकेने सीबीएससी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारी जागा, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधा या सर्वांचा विचार प्रियदर्शनी विद्यालय आणि उस्मानपूरा (Usmanpura) येथील पालिका शाळांची जागा निश्‍चित केली आहे. सोबतच आठ नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळा देखील सुरू केल्या जाणार आहेत.

पहिल्या टप्यात पहिली ते पाचवीच्या इयत्तांसाठी हे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील वर्गाची संख्या वाढवण्यात येईल, असे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. यातील काही शाळ विनाअनुदानीत असतील. तरी देखील विद्यार्थ्यांना मोफतच शिक्षण मिळेल. या शाळांसाठी वेगळ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. साधारणपणे जुलै महिन्यात हे वर्ग सुरु होतील, या दिशेने पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी सवसामान्य कुटुंबांतील असतात, त्यामुळे अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ही बाब लक्षात घेवून शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांसाठी कृतिपुस्तिका म्हणजेच अ‍ॅक्टीव्हीटी बुक तयार केली आहे. यात 15 दिवसांचा गृहपाठ दिला जात आहे. दिलेला वार आणि तारखेनुसार विद्यार्थ्यांनी तो घरबसल्या पूर्ण करायचा आहे. ही कृतिपुस्तिका शिक्षक स्वत: विद्यार्थ्यांच्या घरी नेवून देणार आहे. मनपाचे शिक्षक शशीकांत उबाळे, तुषार ताठे, अश्विनी हिवरडे, दिनेश म्हस्के यांनी ही कृती पुस्तिका तयार केली आहे.

महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत 1 जुलैपासून पालिकेचे शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम सुरु करणार आहे. त्या त्या शाळेतील शिक्षक हे त्या भागात जावून गल्लीत, मंदिरात, घराच्या ओट्यावर पाच सहा मुलांना एकत्र करुन त्यांच्याकडून कविता, बाराखडी, अक्षर लेखन, अंक ओळख याचा सराव करुन घेणार आहे. तर नववी दहावी(SSC) च्या पाच पाच विद्यार्थ्यांना शाळेत बोलून त्यांना गृहपाठ दिला जात आहे.

शहरातील जटवाडा, हिनानगर, पडेगाव, मिसारवाडी, नारेगाव, सातारा, देवळाई या भागांसाठी दहा मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. या भागातील विद्यार्थी सर्वेक्षणाचे काम सुरु असून इमारतीचा देखील शोध घेतला जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com