पांढऱ्या वाघिणीच्या पायाखाली दबून बछड्याचा मृत्यू

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील घटना 
पांढऱ्या वाघिणीच्या पायाखाली दबून बछड्याचा मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या भक्ती वाघिणीच्या पायाखाली दबल्यामुळे दोनपैकी एका पांढऱ्या बछड्याचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या दोन्हीही बछड्यांचे संगोपन बकरीच्या दुधावरच सुरु होते.

पालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या भक्ती वाघिणीने तीन एप्रिल रोजी दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिने त्यांना कधीच जवळ घेतले नाही, दूधदेखील पाजले नाही. त्यामुळे केअर टेकरच्या मदतीने दोन्हीही बछड्यांना बकरीचे दूध ठराविक अंतराने पाजले जात होते.

दरम्यान, सहा एप्रिल रोजी भक्ती वाघीण पिंजऱ्यात रात्री फिरत असताना तिचा पाय एका बछड्यावर पडला. पायाच्या वजनामुळे तो बछडा दबून गेला. त्यावेळेपासून त्याची दूध पिण्याची क्षमता कमी झाली. त्यानंतर त्याने दूध पिणे बंद केले. प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निती सिंग यांनी बछड्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शासकीय पशू सर्व चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अश्विनी राजेंद्र यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या परिसरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com