Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedतिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची यंत्रणा सज्ज

तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची यंत्रणा सज्ज

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाची लागण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकी शंभर खाटांचे याप्रमाणे दोन कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहेत, अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना करोनाची सर्वाधिक लागण होईल असे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांच्या बरोबर दोन बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती पांडेय यांनी दिली. एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथे शंभर खाटांचे कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहे. त्याशिवाय, गरवारे कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारातील शेडमध्ये देखील शंभर खाटांचे कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहे.

सिडको एन ८ येथे करोनाबाधित गरोदर मातांच्या प्रसुतीसाठीचे रुग्णालय तयार केले जात आहे, या ठिकाणी पन्नास खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथील कोव्हिड केअर सेंटरचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे, तर गरवारे कंपनीच्या परिसरातील सेंटरचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जाणार असून ते चालवण्यासाठी कंपनी महापालिकेच्या ताब्यात देणार आहे.

या दोन्ही कोव्हिड केअर सेंटरसाठी बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, अन्य एक डॉक्टर आणि इंटेसिव्हिस्ट अशा चार प्रमुख व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या समन्वयातून या दोन्ही कोव्हिड केअर सेंटरचे काम सुरू राहील असे पांडेय यांनी सांगितले. त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, साहित्य व मनुष्यबळ याचा आढावा घेऊन तयारी केली जात आहे, असे ते म्हणाले. औषधोपचार क्रिटिकल केअर याचादेखील विचार केला जात आहे. पाच वर्षांखालील बालकांचा वेगळा प्रश्न असणार आहे, त्याचीदेखील तयारी केली जात आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या