नव्या पदाधिकाऱ्यांना मिळणार 'ई-कार'

नव्या पदाधिकाऱ्यांना मिळणार 'ई-कार'

औरंगाबाद महापालिकेची तयारी

औरंगाबाद - Aurangabad

(Muncipal elections) महापालिका निवडणुकीची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी तयारी सुरू केली आहे. पदाधिकाऱ्यांची वाहने पर्यावरणपूरक असावेत, प्रदूषणमुक्त असावेत असा प्रयत्न केला जात असून त्यासाठी तब्बल एक कोटींच्या ई-कार खरेदी केल्या जाणार आहे. चार्जिंगसाठी सात (Charging center) चार्जिंग सेंटरही उभारली जाणार आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारने (Pollution free vehicles) प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर करण्याचे संकेत विविध यंत्रणांना दिले आहेत. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद भेटीत महापालिकेला ई-वाहने खरेदी करण्याची सूचना केली होती. स्मार्ट सिटी बसच्या ताफ्यात सुरुवातीला किमान पाच ई-बस असाव्यात अशी कल्पना त्यांनी मांडली होती. त्या खरेदी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत, त्यात राज्य शासन मदत करील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून ६३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. या निधीचा विनीयोग कसा करायचा याचे नियोजन महापालिकेने केले आहे. हे नियोजन करताना ई-कार खरेदी करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

ई-कारची जास्तीची किंमत लक्षात घेता पहिल्या टप्प्यात एक कोटींच्या कार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ही माहिती दिली आहे. महापालिका येत्या काळात नवीन वाहने खरेदी करणार असून ही वाहने ई-वाहने असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेत नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी ही वाहने उपयोगात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका मुख्यालय व स्मार्ट सिटीचे कार्यालय या ठिकाणी प्रत्येकी एक चार्जिंग स्टेशन असणार आहे. त्याशिवाय महापालिका उभारत असलेल्या पाच पेट्रोल पंपावर प्रत्येकी एक या प्रमाणे पाच चार्जिंग स्टेशन असतील.

सध्या मध्यवर्ती जकात नाक्याजवळ पालिकेने सुरु केलेल्या पेट्रोल पंपावर ई-वाहनांच्या चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत वाहनखरेदी व चार्जिंग स्टेशनची उभारणी ही प्रक्रिया पूर्ण होईल असे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.