Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकंत्राटी कामगारांनी शोषणाविरोधात उठाव करावा -यशवंत भोसले

कंत्राटी कामगारांनी शोषणाविरोधात उठाव करावा -यशवंत भोसले

औरंगाबाद – aurangabad

आजघडीला औरंगाबाद महानगरपालिकेतील (Municipal Corporation) पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर वसुली, अग्निशमन यासारख्या विभागांमध्ये कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे. कायमस्वरूपी नोकरदारापेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेऊन ठरवून दिलेले टार्गेट पूर्ण करूनही कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक होत राहते. वर्षानुवर्षे काम करूनही त्यांना सेवेत सामावूनही घेतले जात नाही. अत्यल्प पगाराशिवाय कोणतेच लाभ त्या कामगारांना मिळत नाहीत. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी एकत्रितपणे उठाव केल्यास आम्ही आपली लढाई लढण्यासाठी कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी केले.

- Advertisement -

अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज…!

टीव्ही सेंटर येथील कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवनात बुधवारी (१४ सप्टेंबर) कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या कामगारांसह औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची उपस्थिती होती. मनमाड व नाशिक भागातील महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचीही यावेळी उपस्थिती होती. राष्ट्रीय श्रमिक आघाडीने शिक्रापूरनंतर औरंगाबादमध्ये अशा प्रकारचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी या कामगारांच्या अडीअडचणी जाणून घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे महाराष्ट्र समन्वयक शशांक इनामदार, सचिव अमोल घोरपडे, महावितरण विभागाचे रामदास भाचकर (मनमाड), तुळजापूर मंदिर संस्थानचे प्रतिनिधी दीपक अनंत पलंगे आदींची उपस्थिती होती. 

आजघडीला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे ५७ हजाराहून अधिक सदस्य असून कंत्राटी कामगारांच्या हितासाठी आमचा लढा चालूच आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांना आम्ही नुकताच न्याय मिळवून दिला. ५७२ सफाई कामगारांचा लढा लढून न्यायालयीन मार्गाने या कामगारांना ३९ कोटींचे भुगतान तर करायला भाग पाडलेच शिवाय त्यांना कायमस्वरूपी नोकरदारांइतके वेतनही मिळवून देण्यात यश आले. तुळजापूर देवस्थानातील कंत्राटी कामगारांना तसेच वीज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचा लढा लढत आहोत. यात यश येणार हे नक्की. लढा रस्त्यावर उतरून तर लढला जातोच शिवाय न्यायालयीन लढा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. तो लढत असताना मोजक्याच कामगारांनी याचिका करून चालत नाही. सर्वच्या सर्व पीडितांना एकत्रितपणे याचिका केल्यास आपल्याला यश मिळवता येते. कंत्राटी कामगारांना कमी वेतन तर मिळतेच शिवाय कंत्राटदार दरमहा त्यांच्या वेतनातील ठराविक रक्कम आपले कमिशन म्हणून काढून घेतो. विजेच्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगाराला कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. उलट कायमस्वरूपी नोकरदाराला भरपूर वेतन, पेन्शन, वैद्यकीय सुविधा मिळतात. येणाऱ्या काळात कंत्राटी कामगारांचे अधिकच हाल होणार आहेत. ९० टक्के कामगार हे कंत्राटी पद्धतीनेच भरती होणार असून वेळीच आपली एकजुटता दाखवत उठाव करणे गरजेचे आहे, असे मत यशवंत भाऊ भोसले यांनी व्यक्त केले. 

देशात पर्यायाने राज्यात लवकरच नवनवीन कायदे अंमलात येणार असून ते कंत्राटी कामगारांना अधिक खोलात नेणारे ठरू शकतात. कंत्राटी कामगाराला मिळणाऱ्या वेतनात स्वतःचे घर तो नीट चालवू शकत नाही. मुलाबाळांचे शिक्षण, स्वतःचे घर, भविष्याची तरतूद, पेन्शन यासारखे विषय कालांतराने गंभीर होत जाणार आहेत. त्यातल्या त्यात फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटसारखे नियम लागल्यास कंत्राटी कामगाराला तीन ते पाच वर्षच कामाची संधी मिळणार आहे. तीनशेपेक्षा कमी कामगार असणाऱ्या कंपन्या आपल्या कायमस्वरूपी कामगारांना घरचा रस्ता दाखवून सर्व कामगार हे कंत्राटी पद्धतीने भरती केले जाऊ शकतात. एकंदरीत कंत्राटी कामगारांच्या भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून या कामगारांना योग्य मार्ग व त्यांचा लढा यशापर्यंत लढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील यशवंत भाऊ भोसले यांनी यावेळी नमूद केले. मनमाड, नाशिक आणि औरंगाबादेतील सदस्यांनी यशवंत भाऊ भोसले यांचा सत्कारही केले. यावेळी शेकडो श्रमिकांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासदत्व व स्वीकारले. 

- Advertisment -

ताज्या बातम्या