बालकांमध्ये तापाची साथ

मनपाकडून बाल रुग्णालयांना किट
बालकांमध्ये तापाची साथ

औरंगाबाद - Aurangabad

शहरात मलेरिया, डेंग्यू, काविळच्या (Malaria, dengue, jaundice) साथीने डोके वर काढले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे महापालिकेने अशा रुग्णांची तातडीने कोरोना चाचणी (Corona test) करण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना दिले आहेत. मात्र डॉक्टरांकडून साथीचे आजार असल्याचे सांगत या रुग्णांची कोरोना चाचणी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी दुसर्‍यांदा खासगी दवाखाने व रुग्णालयांना पत्र पाठविण्याचे आदेश पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी (Health Medical Officer) डॉ.पारस मंडलेचा यांनी दिले आहेत.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मात्र अजून संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका मात्र कायम आहे. तर दुसरीकडे कोरोनाची लाट ओसरताच शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. शहरात मलेरिया, डेंग्यू, काविळ साथीच्या विळख्यात हजारो नागरिक अडकले आहेत.

दिवसेंदिवस या साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र या रुग्णांची साधी कोरोना चाचणी देखील केली जात नसल्याचे समोर आले आहे. कोणत्याही खासगी दवाखान्यात व रुग्णालयात साध्या तापेचा रुग्ण आल्यास किंवा दाखल झाल्यास त्याची तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे पत्र पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील 996 रुग्णालये व दवाखान्यांना दिले आहे.

पत्र देवूनही आठ दिवस उलटले तरी एकाही डॉक्टराने रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिलेला नाही. दोन ते तीन दिवस ताप सारखी येत असल्यामुळे रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी गेला तर डॉक्टरांकडून डेंग्यू, काविळची चाचणी करून घेण्याचे सांगितले जाते. त्यानंतर पॅथॉलॉजीच्या चाचणी अहवालावरून उपचार केले जातात. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे कळत नाही, असे डॉ. मंडलेच्या यांनी स्पष्ट केले.

शहरात 36 बाल रुग्णालये आहेत. यात दाखल होणार्‍या बालकांची कोरोना चाचणी करण्यासाठी पालिकेने किट दिल्या आहेत. सध्या बालकांमध्ये तापेची साथ जोरात सुरू आहे. मात्र बालकांची कोरोना चाचणी केल्याबद्दलचा अहवाल एकही बाल रुग्णालयाकडून आलेला नाही. पालिकेने किट पुरविल्यानंतरही बाल रुग्णालयांचा निष्काळजीपणा दिसतत आहे. पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, शहरातील सर्व खासगी दवाखाने व रुग्णालयांना उपचारासाठी आलेल्या तापेच्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे पत्र यापूर्वीच दिले आहे. मात्र दवाखाने, रुग्णालयात चाचणी केली जात नसेलतर दुसर्‍यांदा पत्र पाठवून कोरोना चाचणी सक्तीची करण्याचे आदेशीत केले जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com