डॉ.भागवत कराडांच्या रूपाने औरंगाबादला प्रथमच केंद्रीय मंत्रीपद

ओबीसींना खूश करण्याचा प्रयत्न
डॉ.भागवत कराडांच्या रूपाने औरंगाबादला प्रथमच केंद्रीय मंत्रीपद

औरंगाबाद - Aurangabad

मराठवाड्यातून औरंगाबादचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड (MP Dr. Bhagwat Karad) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना मंत्रीपद देऊन भाजपने एकप्रकारे राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे. विशेष म्हणजे, औरंगाबादला प्रथमच केंद्रीय मंत्रीपद मिळाले असल्याने ही बाब गौरवास्पद मानली जात आहे.

शेतकरी पुत्र डॉ. कराड यांचा नगरसेवक ते केंद्रात मंत्रीपद असा आजपर्यंतचा राजकीय प्रवास आहे. ओबीसी चेहरा असलेले डॉ. भागवत कराड हे मुळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील. त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना 1996 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात भाजप वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. भाजपकडून मराठवाड्यातून बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र मोदी सरकारने ओबीसी चेहरा आणि औरंगाबादेतील आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. कराड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे बोलले जाते.

खासदार डॉ. कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपदी वर्णी लागताच शहरातील उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला. डॉ. कराड मंत्रीपदाची शपथ घेत असताना भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत एकच जल्लोष केला. महिला कार्यकत्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्‍त केला. ढोलताशांच्या गजर करत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. याप्रसंगी माजी नगरसेवक समीर राजुरकर, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, लक्ष्मणराव औटे, राजेश मेहता, प्रशांत देसरडा, अनिल मकरिये, राजगौरव वानखेडे, बबनराव नरवडे, प्रा.गोविंद केंद्रे, व्यंकटेश कमळू, सागर नीलकंठ, रामेश्वर भादवे, चंद्रकांत हिवराळे, बालाजी मुंडे,संजय जोशी, महेश माळवदकर, कचरू घोडके, दयाराम बसय्ये, सविता कुलकर्णी, दिव्या मराठे, माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, मनीषा मुंडे आदींची उपस्थिती होती.

डॉ. कराड यांची राजकीय कारकीर्द अशी

भाजपाकडून केंद्रीय राज्यमंत्री पदावर वर्णी (2021)

भाजपाकडून राज्यसभा सदस्य (2020)

मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष (2018-19)

औरंगाबादचे दोन वेळा महापौर (एप्रिल 2000 ते ऑक्टोबर 2001 व नोव्हेंबर 2006 ते ऑक्टोबर 2007)

भाजपाचे सभागृह नेते, औरंगाबाद महापालिका (1999-2009)

औरंगाबाद महापालिकेचे उपमहापौर (1997-1198)

स्थायी समिती सदस्य, औरंगाबाद महापालिका (1995-1997)

औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक (1995 ते 2010)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com