‘याद पिया की आये’च्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

स्वरझंकार महोत्सव उत्साहात
‘याद पिया की आये’च्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

औरंगाबाद - aurangabad

पटियाला घराण्याच्या अग्रणी शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती (Singer Kaushiki Chakraborty) यांनी सादर केलेल्या 'छब शाम की, शाम छबी मन मोह लियो' 'करुणा करो बागेश्वरी'सारख्या बंदिशी आणि 'याद पिया के आये' या सदाबहार ठुमरीच्या सादरीकरणाने औरंगाबादकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. सोबतच तेजस आणि राजस उपाध्ये यांनी व्हायोलिन ड्युएटचा अप्रतिम असा नजराणा सादर करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

दिवाळीच्या (diwali) धामधुमीनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना पुण्याच्या व्हायोलिन अकादमीच्या वतीने रविवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित स्वरझंकार मैफलीने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तेजस आणि राजस उपाध्ये यांनी राग किरवानीने व्हायोलिन स्वर छेडायला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. व्हायोलिनचा एक एक गुंफला जाणारा स्वर वादकाच्या मनाचा आरसा दर्शवणारा होता. जणू काही वादकाने आपला आत्मा त्या वाद्याला अर्पिला आहे अन् त्याच्या हृदयातील निरागसता या वाद्यामध्ये अवतरली आहे असा भास होत होता. व्हायोलिनच्या स्वरलहरी संपूर्ण प्रेक्षागृहात वाहून आपल्यातली ओजमयता खुल्या हाताने देत होत्या. ही ऊर्जा या स्वरांच्या मार्फत रसिक प्रेक्षकांच्या मनी झळकत होती. स्वरांच्या परावर्तित होणाऱ्या प्रकाशमान लहरी आनंद उधळत होत्या. यातच तबल्याच्या नादाने वातावरण तरंग मय झाले आणि नादब्रम्ह उजळले गेले. तबला अन् व्हायोलिन या अभूतपूर्व युगलबंदीने नाट्यगृह दुमदुमले. व्हायोलिन ड्युएटला तबल्यावर ईशान घोष यांनी उत्तम साथसंगत दिली.    

दुसऱ्या सत्रात पटियाला घराण्यातील शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी उपस्थितांशी संवाद साधत शांत, सौम्य नितळ अन् निरागस स्वरांच्या सयीने मनातली किल्मिष गळून पडली. विलंबित एक तालातील बंदिश 'श्याम कल्याण' उलगडून सांगू लागल्या. स्वरासोबत ते शब्द ही माधुर्यपूर्ण होते. त्या नंतर 'छब शाम की, शाम छबी मन मोह लियो' या दृत बंदिशी सजल्या. त्यानंतर वातावरण सूरावलेले ते 'करुणा करो बागेश्वरी'सारख्या बंदिशी आणि 'याद पिया के आये' या सदाबहार ठुमरीच्या माध्यमाने. या मैफलीत तबल्यावर ईशान घोष, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी तर सारंगीवर मुराद अली यांनी दमदार साथसंगत दिली. वैष्णवी कुलकर्णी यांनीही रसिक श्रोत्यांना भावार्थ ऐकवला. हार्मोनियम, तबला, सारंगी आणि शास्त्रीय गायनाने स्वरझंकार मैफलीची रंगत वाढवली. रसिक औरंगाबादकरांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल व्हायोलिन अकादमीच्या वतीने राजस उपाध्ये यांनी आभार मानले.     

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com