
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
चौकातील सिग्नल (signal) बंद का आहेत, हे विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाहतूक पोलिसाला (police) असा प्रश्न अजिबात आवडला नाही. त्यामुळे त्या तरुणाला वाहतूक पोलिसाने बेदम मारहाण केली.
सिग्नल बंद असल्यामुळे दुचाकी पुढे घेऊन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला सिग्नल बंद का केला, अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलीस कर्मचार्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास क्रांतीचोकाता घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दूध डेअरी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणार्या तरुणाला वाहतूक कर्मचारी चव्हाण यांनी त्यांची दुचाकी क्रांती चौकात अडवली. दुचाकीस्वार तरुणाने साहेब सिग्नल बंद का आहे? अशी विचारणा केली. वाहतूक पोलीस कर्मचारी चव्हाण यांनी तरुणाला दुचाकीवरून खाली उतरताच कानशिलात लगावली. इतकेच नव्हे तर लाथांनी देखील त्या तरुणाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ एका वाहनचालकाने मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तरुण हा मद्यधुंद असून पोलिसांना अरेरावी व शिवीगाळ केल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे.
याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, भररस्त्यात सावजिनक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्यामुळे नेटकर्यांकडून पोलिसांना ट्रोल केले जात आहे.