Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'महावितरण'चे अस्तित्व धोक्यात?

‘महावितरण’चे अस्तित्व धोक्यात?

औरंगाबाद – aurangabad

पैशाअभावी वीज विकत घेणे अशक्य आहे. कंपनी टिकली, तर ग्राहकांना सुलभ दरात वीजपुरवठा शक्य होईल. त्यासाठी प्रत्येक युनिटच्या थकबाकीसह वीज बिल वसूल करा. अन्यथा ‘महावितरण’चे अस्तित्व धोक्यात आहे,’ असे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी सांगितले.

- Advertisement -

विजेचे पैसे ग्राहकांकडून दरमहा वसूल होत नसल्याने महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. मराठवाड्यात वेगवेगळ्या वर्गवारीतील वीजबिलांचे तब्बल १५ हजार कोटी रुपये थकबाकी आहेत. विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे थकबाकीसह वसूल करा; अन्यथा, संबंधितांवर कडक कारवाई करा, अशा सूचना महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिल्या आहेत.

वीज बिलाची थकबाकी महावितरण कंपनीसमोरील मोठी समस्या आहे. वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन ‘महावितरण’ ग्राहकांना पुरवठा करीत आहे. मराठवाड्यात वीजबिलाची थकबाकी वाढत आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे अशा वेगवेगळ्या वर्गवारीतील वीजबिलांची १५ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील अभियत्यांची नुकतीच विशेष आढावा बैठक झाली.

यावेळी ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक देयके व महसूल विभागाचे योगेश गडकरी, औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दतात्रय पडळकर, प्रभारी महाव्यवस्थापक वित्त व लेखा लक्ष्मीकांत राजेल्ली यांच्यासह अधिक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते. या बैठकीत सिंघल यांनी महावितरणसमोरील अडचणी मांडल्या.

‘राज्यात महावितरण कंपनीच्या ग्राहकांकडे ६६ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. शिवाय, ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. महावितरण कंपनी ‘महानिर्मिती’सह अन्य वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन ग्राहकांना पुरवठा करते. ‘महावितरण’ला कंपन्यांचे विजेचे पैसे, वीजवहनाचे पैसे, देखभाल दुरूस्ती, पायाभूत सुविधा व व्यवस्थापनाच्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. पैशाअभावी वीज विकत घेणे अशक्य आहे. कंपनी टिकली, तर ग्राहकांना सुलभ दरात वीजपुरवठा शक्य होईल. त्यासाठी प्रत्येक युनिटच्या थकबाकीसह वीज बिल वसूल करा. अन्यथा ‘महावितरण’चे अस्तित्व धोक्यात आहे,’ असे सिंघल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या