औरंगाबादमध्ये बालकांसाठी 736 बेड्सची व्यवस्था

तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर तयारी
औरंगाबादमध्ये बालकांसाठी 736 बेड्सची व्यवस्था

औरंगाबाद -Aurangabad

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी सुरु केली आहे. बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात 736 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 45 व्हेंटिलेटर्स आणि 437 ऑक्सिजनचे बेड्स असणार आहे. सोबतच एमजीएम आणि मेल्ट्रॉनमधील बाल कोविड सेंटरमध्ये महापालिकेचे डॉक्टर्स कार्यरत ठेवले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याचे चित्र आहे. दररोज रुग्णसंख्या कमी निघत असून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे दुसरी लाट नियंत्रणात आणण्याास प्रशासनाला यश येत आहे. मात्र आता जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्‍त केली आहे. या लाटेमध्ये बालकांना सर्वाधिक लागण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्य सरकारने बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जाहिर केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात बालकांसाठी गरवारे कंपनीत शंभर बेड्सचे बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्येही शंभर बेड्सचे बाल कोविड रुग्णाधलय तयार केले जात आहे.

शहरात डेडिकेटेड कोविड केअर सेंटर 8 असून त्यामध्ये 242 बेड्सची व्यवस्था असणार आहे. त्यातही व्हेंटिलेटर्स 6, एनआयसीयूचे 24, पीआयसीयू 20, व इतर 198 बेड राहतील. डेडिकेटेड कोविड सेंटर 9 असतील. त्यामध्ये 394 बेड राहणार असून व्हेंटिलेटरचे 39, एनआयसीयू 49, पीआयसीयू 94, इतर 251 बेड्स राहतील. एकूण 18 रुग्णालयात 736 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटरचे 45 बेड्स एनआयसीयू 73 बेड्स, पीआयसीयू 114 बेड्स, इतर 549 बेड्सचा समावेश असणार आहे. डीसीएचसीमध्ये गरवारेसह सात खासगी रुग्णालय आणि डीएचसीमध्ये घाटी, एमजीएमसह सात खासगी रुग्णालयांत व्यवस्था असेल. याविषयी आयुक्‍त पांडेय हे आदेश काढणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

बालकांसाठी मेल्ट्रॉनमध्येही 50 बेड्सची व्यवस्था केलेली आहे. या बेड्सला ऑक्सीजनची सुविधा असणार आहे. त्यासोबतच एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्समधील कोविड सेंटरसाठी पालिकेचे डॉक्टर्स व कर्मचारी राहतील. गरवारे बाल कोविड सेंटरकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. यात पिडियाट्रिक संघटनेने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. सोबतच बालकांवरील उपचारासाठी औषधी व इतर साहित्य खरेदी केले जाणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com