‘मुक्तीसोपान’च्या आजींनी धरला भोंडला गीतांवर ताल!

औरंगाबाद – aurangabad

ऐलमा, पैलमा गणेश देवा, शिवाजी आमचा राणा, एक लिंबू झेलू बाई एक लिंबू झेलू आणि अक्कण माती, चिक्कण मातीसारख्या मराठमोळ्या पारंपरिक गीतांवर समर्थनगर येथील मुक्तीसोपान न्यास वृद्धाश्रमातील आजींनी मनसोक्त ठेका धरला. डब्यातील खाऊ अर्थात खिरापत ओळखण्याची मज्जाही अनुभवली. नंतर रंगलेल्या गप्पात भोंडलाविषयीच्या बालपणाच्या आठवणीत त्या रममाण झाल्या. निमित्त होते आस्था जनविकास संस्थेच्या वतीने मुक्तीसोपान न्यासात आयोजित भोंडला उत्सवाचे.

कार्यक्रमाची सुरुवात हत्ती आणि भूलाबाईच्या पूजनाने झाली. ऐलमा, पैलमा गीताद्वारे गणेशाला वंदन करण्यात आले. या उत्सवाच्या मानकरी सोळा वर्षापर्यंतच्या मुली असल्या तरी आजींनी फेर धरून यात सहभाग नोंदवला. कार्ल्याचा वेल, आतुला मातुला, नणंदा भावजया सासरच्या वाटे, कुच कुच काटे यासारख्या गीतांवर सुमारे दोन तास कार्यक्रम रंगला. भोंडल्याचा खेळात खाऊ ओळखण्याची स्पर्धा असते. संस्थेने डब्यात आणलेला खाऊ आजींना ओळखायला लावला. शेवटी अंगत पंगत करत याच खाऊचा आस्वाद घेतला. अंजू मुळे, आशा तेल, प्राजक्ता मुर्किकर, दीपाली पाठक यांनी एकाहून एक सरस गीते सह अभिनय सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मौखिक स्वरूपात एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत चालत आलेल्या या वारशाचा सर्वानींची मनापासून आनंद घेतला. 

यावेळी आस्थाच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी, मुक्तीसोपानच्या सचिव मालती करंदीकर,ज्योती चिटगोपेकर आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमासाठी विजय रणदिवे, आदिती आठवले, यामिनी आसर, रुपाली कुलकर्णी, मंजुषा माळवतकर, ज्योत्सना पुजारी, ज्योती करमासे, जयश्री शेंडगे, विद्या पाटील, वैशाली सदगुले, राधिका देशमुख यांनी सहकार्य केले.

 भोंडल्याविषयी?

भाद्रपद पोर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत हादगा-भोंडला म्हणजेच भूलाबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला मुंबई-पुण्यात हादगा-भोंडला तर मराठवाड्यात भूलाबाई असेही म्हटले जाते. हा केवळ धार्मिक, पारंपरिक उत्सव नसून याद्वारे महिलांतील सुप्त कलागुणांना वाव मिळतो.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *