
औरंगाबाद- विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, निसर्गाच्या सानिध्यात राहून शिकण्याची संधी मिळावी, निसर्गात बागडता यावे, पक्षी, प्राणी, फळे, फुले, झाडे, वेली यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी. विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने औरंगाबाद विभागातील शाळांनी निसर्ग सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे.
निसर्ग सहलीचे आयोजन करत असतांना सहल ही निसर्गरम्य परिसरामध्ये आयोजित करावी. निसर्ग सहलीतून विद्यार्थ्यांना प्राणी, पक्षी, फळे, फुले, विविध वनस्पती, डोंगर, नद्या, टेकड्या त्यांची वैशिष्ट्ये इत्यादीची माहिती मिळू शकेल. सहली दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांनी बघितलेल्या प्राणी, फुलपाखरू, पक्षी, पाने, फुले, फळे, डोंगर, नद्या इत्यादीचे टिपण घेण्यास सांगावे. शक्य असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बिया, पाने, फळे, फुले इत्यादीचे नमुने गोळा करण्यास सांगावे. निसर्ग सहलीचे आयोजन 16 ते 21 जानेवारी 2023 या दरम्यान करावे.
निसर्ग सहलींचा अहवाल शाळांनी काही निवडक छायाचित्रांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयास व गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा. शिक्षणाधिकारी यांनी अहवाल निवडक छायाचित्रांसह विभागीय आयुक्तालयास 31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.