Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळती; अजित पवार म्हणाले...

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळती; अजित पवार म्हणाले…

मुंबई | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या…

- Advertisement -

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे.

या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या