प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न हेच माझे स्वप्न-पद्मश्री राहिबाई पोपेरे

प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न हेच माझे स्वप्न-पद्मश्री राहिबाई पोपेरे

औरंगाबाद - aurangabad

सध्याच्या जीवन शैलीमुळे विविध आजारांना सर्वांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांवर नियंत्रण आणायचे असेल तर नैसर्गिक शेती (Natural farming) हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरत प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न द्यावे, हेच माझे स्वप्न असल्याचे बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे (Padma Shri Rahibai Popere) म्हणाल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) नाट्य सभागृहात श्रीश्री नैसर्गिक शेती संस्था, औरंगाबाद एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाच्यावतीने आयोजित (Farmers) शेतकरी जैविक निविष्ठा कार्यशाळा व कृषी व्यापार महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात श्रीमती पोपेरे बोलत होत्या. कार्यशाळेचे उद्घाटन अदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. आदिवासी मंत्रालयाचे सहसचिव नवल कपूर, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, आत्माराम धाबे, श्रीश्री नैसर्गिक शेती संस्थेचे चेअरमन डॉ.प्रभाकर राव, विश्वस्त अर्चना झा, आदिवासी विकास ‍विभागाचे ससाने आदींची यावेळी उपस्थिती होती.

विषमुक्त शेती आदिवासी बांधवच करू शकतो. बी विकत आणण्याची त्यांना गरजच नाही, कारण आपल्या शेतात आपण उत्पादन घेतो, त्यातूनच आपण विषमुक्त शेती करू शकतो. काळाची गरज ओळखून सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्याचे मी ठरवले, परंतु मला विरोध झाला. मात्र, जेव्हा कुटुंबातील सदस्य आजारी पडला, पाण्यासारखा पैसा त्याच्या उपचारावर गेला. तेव्हा माझ्या कुटुंबालाही नैसर्गिक शेतीची महती पटली. सेंद्रीय शेती केवळ एखाद्या गावापुरते मर्यादित न राहता गावोगावी राहिबाई तयार व्हाव्यात, अशीच माझी अपेक्षा असल्याचे पोपेरे म्हणाल्या.

नैसर्गिक शेती प्रत्येकाने करणे अत्यावश्यक झालेले आहे. ऋतूमानाप्रमाणे फळ, भाजीपाला, अन्न धान्यांची आवश्यकता असते. परंतु आता रासायनिक खतांमुळे कोणत्याही ‌ऋतूत हवे ते फळ उपलब्ध होते आहे. अशी उपलब्ध फळे, भाजीपाला शरिरासाठी पोषक नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. जुने ते सोनेच या प्रमाणे जुन्या पद्धतीच्याच बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडला. त्याचबरोबर मानवाचेही आरोग्य बिघडत आहे. म्हणून सध्याची गरज नैसर्गिक शेती आहे. या शेतीतून योग्य मार्गदर्शनाखाली भरघोस उत्पन्न येऊ शकते. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीच्या मार्गाचा अवलंब करावा. महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी होत असून देशासमोर महाराष्ट्राचा या प्रयोगाचा आदर्श निर्माण होईल, असे कार्य शेतकऱ्यांनी करावे, असे कपूर म्हणाले. मेळाव्याचे कौतुक करत सेंद्रीय शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य देण्याचे आवाहन गव्हाणे यांनी केले. आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त ससाने, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभाकर राव, सुधीर चापते यांनीही विचार मांडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com