दोन वर्षांच्या खंडानंतर बाजारात उत्साह

सुपर संडेला तुफान खरेदी 
दोन वर्षांच्या खंडानंतर बाजारात उत्साह

औरंगाबाद - aurangabad

दोन वर्षांपासून कोरोना (corona) संसर्गकाळामुळे फिका राहिलेला दीपोत्सव (diwali) यंदा दमदार असा असल्याचे पाहावयास मिळत आहे. भलेही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी आली असली तरी औद्योगिक नगरी (Industrial city) अशी ओळख असणाऱ्या औरंगाबादमधील बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारासोबत बोनसही दिला. त्यामुळे औरंगाबादकर दिलखुलासपणे खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनिमित्त सर्वाधिक उलाढाल कापड बाजारात उलाढाल होत आहे. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने गुलमंडी, सिटी चौक, औरंगपुरा, त्रिमूर्ती चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या भागातील दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. सराफा, मोबाईल, गॅजेट्स, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रिज, टू व्हीलर, कार खरेदीकडे मोठा कल पाहायला मिळत आहे.  

सलग दोन वर्षे कोविड १९ मुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या, कित्येकांना पूर्ण पगार मिळाले नाहीत. परिणामी लोकांची क्रयशक्ती कमी झाली असणार असे मानले जात होते. परंतु, तसे झाले नाही. दसऱ्याला बाजारपेठेत जो उत्साह होता त्यापेक्षाही अधिकचा उत्साह यंदा दिवाळीत पाहायला मिळत आहे. या दिवाळीच्या खरेदीचे आणखी एक महत्व म्हणजे औरंगाबादकरांनी चिनी वस्तू फार कमी खरेदी केल्या.

जास्त पैसे मोजून जास्तीत जास्त स्थानिक तथा मेड इन इंडिया वस्तू खरेदी केल्या. चायनिज वस्तूंबाबत सरकारने निर्णय घेण्याऐवजी जनतेने स्वेच्छेने चिनी वस्तू नाकारल्याचे एकंदर चित्र आहे. स्थानिक कारागिरांनी तयार केलेले आकर्षक आकाश कंदील, विविध रोषणाई, लाईटच्या माळा, झुंबर, पताका आदी प्रकारच्या वस्तू चांगल्याच विकल्या जात आहेत. आकाश कंदीलामध्येही अनेक प्रकार व कल्पकता वापरून केलेल्या डिझाईन्सने ग्राहकांना आकर्षित केले आहे. घरावर, अंगणातील झाडावर, दुकानांवर रोषणाई करण्यासाठी लाईटच्या रंगीबेरंगी माळा चांगल्याच विक्री होत आहे. त्यासाठी स्थानिक माळांबरोबरच कमी किमतीत मिळणाऱ्या चिनी माळांनाही उत्तम मागणी आहे.

लोकांमध्ये दिवाळीचा उत्साह पाहावयास मिळत आहे. मात्र शनिवार आणि रविवारी शहरातील बाजारपेठेत प्रंचड गर्दी पाहावयास मिळाली. गुलमंडी, शहागंज, औरंगपुरा, गजानन महाराज मंदिर, जवाहर कॉलनी, सिडको, हडको यासह शहरातील सर्वच बाजार पेठांमध्ये खरेदीसाठी रेलचेल सुरू आहे. कपडा, सराफा, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीकल्स, वाहन मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. यामुळे व्यापार्‍यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तरुणाईचा ऑनलाइन खरेदीकडेही मोठा ओढा असल्याचे दिसत आहे. याशिवाय कापड मार्केटमध्येही खरेदीचा उत्साह पहावयास मिळाला असून, यावर्षी रेडीमेड कपड्यांवर अधिक भर देण्यात आला आहे.

दिवाळीनिमित्त दरवर्षी बाजारात चैतन्य असते, परंतू दोन वर्षात कोरोनामुळे लोकांना सणवार साजरे करता आले नाही. यंदा मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसत

आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. शासनाची मदत अजून हातात पडली नाही. ग्रामीण भागात म्हणावा तसा उत्साह नसला तरी दिवाळीसारखा महत्वाचा सण गोडधोड करून साजरा करावा लागणार असल्याने ग्रामस्थांनीही आळस झटकून सण साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर छोट्या व्यावसायिकांनी फुले, लक्ष्मी फोटो, मुरमुरे, फुटाणे, पाच फळे, बत्ताशे आदी पुजेच्या साहित्यासह फडा, फडी, मातीचे बोळके असे साहित्य विक्रीसाठी आणले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com