कोरोनानंतर आता औरंगाबादकरांना डेंग्यूचा धोका!

आगामी तीन महिने धोक्याचे
कोरोनानंतर आता औरंगाबादकरांना डेंग्यूचा धोका!

औरंगाबाद - Aurangabad

ताप कोणताही असो, आता (Corona) कोरोनासोबत डेंग्यूची (Dengue) चाचणी करणे गरजेचे आहे. या दोन्हीही चाचण्यांची सक्ती महापालिका करणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर (Dr. Nita Padalkar) यांनी दिली. डेंग्यूसाठी ऑक्टोबरपर्यंतचे तीन महिने धोक्याचे आहेत. थोडी लक्षणे आढळली, तरी नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

औरंगाबाद शहरात कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात आली आहे. रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. रोज पंधरा-वीस रुग्ण पालिकेच्या क्षेत्रात आढळत आहेत. दुसरी लाट नियंत्रणात आलेली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली असली, तरी डेंग्यू-मलेरिया यासारखे साथीचे आजार बळावू लागले आहेत.

डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, 'कोरोनाच्या रोज सरासरी दोन हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्यातून १५-२० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने आता डेंगी-मलेरिया या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढण्याची देखील शक्यता आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे ३० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना आणि डेंग्यू या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, खोकला, ताप, थंडी वाजणे अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे कोणताही ताप असला तरी आता कोरोना आणि डेंग्यूची चाचणी करणे गरजेचे आहे.'

'कोरोना आणि डेंगीसाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत. कोरोनाबाधिताच्या फुफ्फुसाला बाधा पोहोचते, त्यामुळे सिटी स्कॅनच्या माध्यमातून 'एचआरसीटी' चाचणी करावी लागते. डेंगी झालेल्या रुग्णाची 'आयजीएम' चाचणी करावी लागते. डेंग्यू-मलेरियासारखे साथीचे आजार टाळण्यासाठी व कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे, गर्दीपासून लांब राहणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, पाणी उकळून पिणे आदी नियम पाळले पाहिजेत,' असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com