‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करणार!

जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय
‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करणार!

औरंगाबाद - aurangabad

वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे नद्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. प्रदुषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणुया नदीला’ या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

‘चला जाणुया नदीला’ या अभियानासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम वर्धा येथून या अभियानाची सुरूवात झालेली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून 26 तारखेला खाम नदीला भेट देण्यात येणार आहे. तसेच 12 ते 25 डिसेंबर या कालावधीत शिवना आणि दुधना नदी आणि परिसराला भेट देण्यात येणार आहे. या अभियानाविषयी जाणीव जागृती करावी. या अभियानामध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि पालकांची भूमिका देखील महत्वाची असणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना म्हणाले की, हे अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा देखील सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धेच्या माध्यमातून ह्या अभियानाविषयी जाणीव जागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, रामेश्वर रोडगे, विधाते, राज्यस्तरीय समितीचे सदस्य रमाकांत कुलकर्णी, अभियानाचे समन्वयक अण्णा वैद्य, गोकुळ सुरासे, श्याम दंडे, सतिश वाघ तसेच संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

अभियानाचे उद्दिष्ट्य

1. नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे

2. जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे

3. नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वंकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे

4. अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे

5. नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबबात प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे

6. नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार याबाबत नियोजन करणे

7. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे इ.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com