खबरदार... यु डायस प्लसमध्ये चुकीची माहिती दिल्यास होणार कारवाई

दंडात्मक कारवाईचे संकेत
खबरदार... यु डायस प्लसमध्ये चुकीची माहिती दिल्यास होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन वर्षापासून करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, विविध योजना व संपूर्ण विषयाची माहिती संकलित करण्याचे काम यु डायस प्रणाली (U Dice Plus System) मध्ये सुरू आहे. या प्रणालीमध्ये शाळांनी वेळेत माहिती भरावी. संपूर्ण माहिती न दिल्यास अशा शाळा दंडात्मक कारवाईला (Penal action) पात्र ठरणार आहेत.

यु डायस प्लस प्रणाली ही केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केली आहे. समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यु डायस प्लस प्रणालीमार्फत माहिती मागविली जाते. यातील यु डायस प्लस ऑनलाइन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य, जिल्हा, महानगरपालिका व तालुका तसेच शाळा स्तरावरून ऑनलाईन भरणे आवश्यक असते. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदवली जाते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ हजार ६०२ शाळांना या प्रणालीशी जोडण्यात आले आहे. या शाळामध्ये शिक्षण घेणारे ९ लाख ५१ हजार ४६४ विद्यार्थी आहेत. केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला यामध्ये जोडण्याची सूचना केली आहे. यामध्ये खोटी अथवा चुकीची माहिती भरल्यास शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील ७८ टक्‍के शाळांनी यु डायस प्रणालीत माहिती अपलोड केली आहे. येत्या आठ दिवसांत शाळांनी माहिती न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com