रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर केल्यास कारवाई

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा पाहता लोकप्रतिनिधींनी हे इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी आढावा बैठकीत केली. इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळून, आवश्यक तेथेच या इंजेक्शनचा वापर करावा, अशी मागणीही लोकप्रतिनिधीनीं प्रशासनाकडे केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर केल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संयुक्‍त बैठक झाली. या बैठकीसाठी खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, आमदारांत अंबादास दानवे, सतीश चव्हाण, संजय शिरसाठ, अतुल सावे, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, प्रदिप जैस्वाल, हरिभाऊ बागडे यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी लोकप्रतिनिधींनी रेमडेसिवीर तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. खासगी डॉक्टरांनी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी करावयाची असताना अनेक डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना प्रिस्क्रीप्शनमध्ये रेमडेसिवीर लिहून देत आहेत, अशांवर कारवाई करण्याची सूचना खा.डॉ. कराड यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी केली. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरांना या इंजेक्शनचया योग्य वापराबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्याबाबतची सूचनाही केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *