पैठणचे ज्ञानेश्वर उद्यान पूनरूज्जीवनाच्या कामांना गती द्या-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पैठणचे ज्ञानेश्वर उद्यान पूनरूज्जीवनाच्या कामांना गती द्या-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद शहरासाठीची पाणी पुरवठा योजना, शहरात साकारण्यात येणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक तसेच पैठण येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) उद्यानाचे पुनरूज्जीवन यांसह जिल्हयातील तसेच पैठण मतदार संघातील विविध महत्वपूर्ण विकास कामे, प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले. औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेसाठी या सर्व प्रकल्पांना निधी वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सूचना केल्या.

औरंगाबाद जिल्हा आणि पैठण मतदार संघातील विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृहातील या बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार सिंघल, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पर्यटन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांड्ये, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सर्व कामांबाबत निर्देश देताना म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात यावी. त्यासाठी जायकवडीच्या जलाशयातील उद्भव विहीरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. योजनेतील टप्प्याटप्पाने कामांची पुर्तता आणि आवश्यक निधीची मागणी याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने सुरु असलेल्या कामांना वेग द्यावा. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

औरंगाबाद महापालिकेच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृती वनाच्या कामास गती देण्यात यावी. या ठिकाणच्या पुतळ्याचे अंतिम आरेखन निश्चित करण्यात यावे. हे आरेखन सर्वोत्तम असावे संग्रहालयात प्रदर्शित करावयाची माहितीबाबत तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. लोकांकडूनही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणी, माहिती मागवण्यात यावी. महापालिकेने या परिसरातील वनीकरण आणि अन्य कामे वेळेत पूर्ण व्हावीत याकडे लक्ष पुरवावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पुनर्विकास होईपर्यंत ते तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा लोकांसाठी खुले व्हावे यासाठी आवश्यक असा निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. यावेळी जलसंपदा विभागाने या उद्यानाचा पुनर्विकासाबाबत आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त केल्याची माहिती सादर केली. सुमारे १७५ एकरवरील या उद्यानात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा या दृष्टीने पर्यटन स्थळ साकारण्यात येणार आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी महत्वाचे स्थळ ठरेल, त्यादृष्टीने जलसंपदा, पर्यटन आणि वित्त विभागाने समन्वयाने उद्यानाचे पुनरूज्जीवन आणि पुनर्विकासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पैठण येथे महावितरणचे विभागीय कार्यालय तसेच बिडकीन नवीन उपविभागांची निर्मिती, विहामांडवा येथे १३२ केव्ही उपकेंद्र निर्माण करणे, औरंगपूरवाडी, दरकवाडी, रहाटगाव व केकतजळगाव येथील उपकेंद्राच्या उभारणी बाबतही बैठकीत चर्चा झाली.

पोलीस गृहनिर्माण योजनेतून पोलीस आयुक्तालयासाठी तसेच क्रांती चौक येथे ७८० निवासस्थाने व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) करिता ४०५ निवासस्थाने बांधण्याबातही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस गृहनिर्माण मंडळाला तातडीने आराखडे तयार करण्याचे, तसेच त्याबाबतचे प्रस्ताव सादर करून या कामांला गती देण्याचे निर्देश दिले. विहामांडवा येथे नवीन पोलीस स्टेशन निर्मितीबाबतही चर्चा झाली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com