Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedअभिषेकला सहा महिन्यांनंतर मिळाली आई!

अभिषेकला सहा महिन्यांनंतर मिळाली आई!

मलकापूर । प्रतिनिधी

शहरात सद्यःस्थितीत कडक लॉकडाऊन सुरू असून संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच सायंकाळी सहा वाजेदरम्यान पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर शहर पो.स्टे.कडे जात असताना तहसील चौकात अंदाजे 45 वर्षीय मनोरुग्ण महिला हातात दोन बॅगा घेऊन भटकताना दिसल्याने त्यांनी सहकारी पत्रकार गौरव खरे, समाधान सुरवाडे, विजय वर्मा आदींना सोबत घेत तहसील चौकातील ड्यूटीवर तैनात असलेल्या सुरेश रोकडे यांना सांगितले.

- Advertisement -

शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनाही भ्रमणध्वनीद्वारे पत्रकार ठोसर यांनी माहिती दिली. पो.नि.काटकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत परिस्थितीचा आढावा घेतला. गजानन ठोसर यांनी अनाथांचे कैवारी, सेवा संकल्प प्रतिष्ठान पळासखेड ता.चिखली येथील डॉ.नंदकिशोर पालवे यांच्याशी संपर्क साधला असता डॉ.पालवे यांनी मलकापूर येथे येऊन शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, गजानन ठोसरसह पत्रकार व पोलिसांच्या मदतीने त्या महिलेस पळासखेड येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानात आणले.

आधारकार्डने मिळाला आधार

त्या महिलेच्या आधार कार्डवरील पत्यावरुन ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर पोलीस स्टेशनशी ठोसर यांनी संपर्क साधत ठाणे अंमलदार रामटेके यांना सदर महिलेची मीसिंग तक्रार वगैरे दाखल आहे का? याबाबत विचारणा केली. मात्र, रामटेके यांनी सदर महिलेबाबत मीसिंग दाखल नसून सहकार्य दाखवित त्या महिलेच्या आधार कार्डवरील पत्त्यावर घरी जाऊन तिचा भाऊ सुरेश वंजारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलणे करुन दिले.

नंतर सुरेश वंजारी यांनी ही माहिती भोपाळ येथील मोठे बंधू नरेश वंजारी, त्या महिलेचा वापी (गुजरात) येथील मुलगा अभिषेक उर्फ दादू यास दिल्याने दादू याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून आई सहा महिन्यांपासून मी तुझी वाट पाहत आहे व तू भेटावी म्हणून दररोज देवाला अगरबत्तीसुद्धा लावीत आहे, आई तू आता मला मिळाली असून उद्या तुला घेण्यासाठी मी मलकापूर येथे येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणाचे तेज तिच्या चेहर्‍यावर उमटले आणि उपस्थितांनासुद्धा बरे वाटले.

आईला घेण्यासाठी अभिषेक उर्फ दादू हा त्याच्या मामा नरेश वंजारीसह मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता. मलकापूर येथून पत्रकार गजानन ठोसर, शहराध्यक्ष वीरसिंहदादा राजपूत, पत्रकार गौरव खरे, समाधान सुरवाडे, राजेश इंगळे आदींनी वंजारी परिवारासोबत पळासखेड (चिखली) येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान गाठले. दादूला त्याची आई मिळवून दिली.

यावेळी दादूने आईला मिठी मारली. तब्बल सहा महिन्यांनंतर माय-लेकांची अनपेक्षित भेट झाल्याने दोघांचेही अश्रू अनावर झाले होते. कायदेशीर सोपस्कार पार पाडून आईला अभिषेकच्या ताब्यात देण्यात आले. अभिषेकने मलकापूर येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शहर पो. नि. प्रल्हाद काटकर, पोलीस कर्मचारी वृंद, तसेच डॉ. नंदकिशोर पालवे यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या