Wednesday, April 24, 2024
HomeUncategorized15 दिवसात डेंग्यूचे तब्बल 84 रुग्ण

15 दिवसात डेंग्यूचे तब्बल 84 रुग्ण

औरंगाबाद- Aurangabad

मागील काही दिवसांपासून शहरात (Malaria, Dengue) मलेरिया, डेंग्यू, चिकुन गुणिया, काविळ या साथी आजारांनी शहरास विळखा घालण्यास सुरूवात केली आहे. सप्टेंबरच्या 15 दिवसात डेंग्यूचे तब्बल 84 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 44 हे संशयित असून 40 जण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. सध्या तापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळत असले तरी या रुग्णांना मलेरिया झाला किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने आरोग्य विभागाकडून घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात ऐन सणासुदीच्या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकुन गुणिया, काविळ या साथीच्या आजारांनी हजारो रुग्ण आढळून येत आहे. हे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून बोटावर मोजण्याइतक्याच रुग्णांवर पालिकेच्या आरोग्य केंद्रांत उपचार केले जात आहे. एक वर्षाआड डेंग्यूची साथ येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील साथीच्या आजाराबद्दल माहिती देताना पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, शहरात मलेरिया, डेंग्यू, चिकुन गुणिया, काविळ या साथीचे रुग्ण अधिक आढळत आहे. साथींच्या आजारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पालिकेकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे.

सप्टेंबरच्या 15 दिवसांतच डेंग्यूचे 40 पॉझिटिव्ह आणि 44 संशयीत रुग्ण असे मिळून 84 रुग्ण आहेत. संशयीत रुग्णांची माहिती खासगी रुग्णालयाकडून मिळालेली असून खासगी पॅथॉलॉजीमध्ये रक्तांच्या नमुन्यांची तपासणी करून त्याच्या अहवालामध्ये हे डेंग्यूसदृष्य असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांवरही डेंग्यूचाच उपचार केला जात आहे. तसेच चिकुन गुणियाचे रुग्ण अधिक असल्याने त्यांची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

शहरात तापेचे रूग्ण अधिक आढळत आहेत. हा ताप नेमका कोणता आहे? याबद्दल मात्र त्याची तपासणी होत नाही. मलेरियाचा एकही रुग्ण शहरात नसल्याचा दावा पालिकेया आरोग्य विभागाने केला आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रांत तापेच्या रुग्णांवर उपचार केले जात असले तरी त्या रुग्णांची मलेरिया चाचणी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. मलेरियासाठी रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत पाठवावे लागतात. त्यामुळे हे किचकट काम करण्यास टाळाटाळ होत आहे. याचा परिणाम तापेचे निदान योग्य पध्दतीने होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी पॅथॉलॉजीमध्ये जाऊन रुग्णांनीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या