Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसमृद्धीवर नवी अडचण ; ओव्हरस्पीड वाहनांचे फोटोच निघेना!

समृद्धीवर नवी अडचण ; ओव्हरस्पीड वाहनांचे फोटोच निघेना!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Maharashtra Samriddhi Highway) लोकार्पणापासून आजवर शंभरावर अपघात झाले असून त्यात मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अतिवेग हे समृद्धीवरील अपघातांचे मुख्य कारण असल्याने त्यावर नियंत्रण कसे मिळवावे यावर मंथन सुरू आहे. आरटीओकडून स्पीड गनच्या माध्यमातून अपेक्षेपेक्षा जास्त भरधाव वाहनांना दंड आकारला जात असला तरी वाहनाच्या अतिवेगाने त्यांचे फोटो काढणे आता कठीण होऊन बसले आहे. 

- Advertisement -

समृद्धीवरील अपघाताची मालिका थांबविण्यासाठी विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत; मात्र या महामार्गावर निश्‍चित केलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालविण्यात येत आहे. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभागाकडे एकही आधुनिक स्पीडगन असलेले वाहन नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या असलेली स्पौडगनची वाहने ही मध्यम वेगाच्या वाहनांसाठी असल्याने हायवे किंवा शहराकडे येणाऱ्या वाहनधारकांवर या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागाकडे शासनाने स्पीड गन असलेली तीन वाहने दिलेली आहेत. ही स्पीड गनची वाहने वाळूज रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर, सोलापूर-धुळे महामार्गासह जिल्ह्यातील अन्य मार्गावर वेगात चालणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी लावण्यात आलेल्या आहेत. या स्पीड गनच्या माध्यमातून प्रतितास ८० ते ११० किलोमीटर या वेगात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असते. या वेगमर्यादा असलेल्या वाहने स्पीड गन असलेल्या वाहनांमधून टिपता येत असतात.

या स्पीड गनमधील तंत्रज्ञान हे ११० ते १५० किंवा १६० किलोमिटर प्रतितास चालणाऱ्या वाहनांचा वेग मोजू शकतात. मात्र, या वाहनांचा चांगला फोटो काढता येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ विभागाने समृद्धी महामार्गावर वेगात जाणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी या स्पीड गनचा उपयोग केला. मात्र, नीट फोटो काढता येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे समृद्धी महामार्गावर वेगात चालणाऱ्या गाड्यांवर आरटीओ विभागाकडून ओव्हरस्पीडची कारवाई सध्या शक्‍य नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी यंत्र नसल्याने, अशा वाहनांवर कारवाईसाठी दुसरा उपाय अमलात आणला जात आहे. यात ज्या ठिकाणी वाहन समृद्धी महामार्गावर येत आहे. त्या मार्गावरून ते वाहन समृद्धी महामार्गाच्या खाली उतरते. या दरम्यान झालेले आणि वेळ असा हिशेब लावण्यात येत आहे. अशा वाहनधारकांचे समुपदेशन केले जाते. तर काही वेळेस अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. समृद्धीशिवाय राज्यातील विविध भागात एक्स्प्रेस हायवे वाढलेले आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभागाकडून आधुनिक स्पीड गन असलेल्या वाहनांची मागणी केली जात आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या