अतिवृष्टीमुळे ८० सिंचन प्रकल्पांचे ५१ कोटीचे नुकसान

पाटबंधारेच्या पाहणीतील निष्कर्ष
अतिवृष्टीमुळे ८० सिंचन प्रकल्पांचे ५१ कोटीचे नुकसान

औरंगाबाद - Aurangabad

गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालासोबतच सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या ८० लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांचे (Irrigation project) तब्बल ५७.७१ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. काही प्रकल्पाच्या भिंती कोसळल्या, तर काहींना भगदाडे पडले. काही ठिकाणी केटी बंधारे वाहून गेले आहेत. पुढील धोका टाळण्यासाठी त्यांची दुरूस्ती आवश्यक असून यासाठी (Collector) जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतीवृष्टी झाली. यामुळे एकिकडे पाटबंधारे विभागाचे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम.निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांची क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. या प्रकल्पातून एकूण ४२२२४ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

सिंचन प्रकल्पांना धोका

जिल्ह्यातील १० मध्यम व ६३ लघु सिंचन प्रकल्प तसेच ७ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पाहणीतून समोर आले आहे. हे बंधारे १९५० ते २००० या कालावधीत बांधले असून १०-१२ वर्षात त्यांची निधीअभावी देखभाल, दुरूस्ती झालेली नाही. सततच्या पावसाने हे प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले. तर २८ सप्टेंबरच्या गुलाब चक्रीवादळामुळे १०० मीमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे धरणे आणि कालव्यांची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे धरणांना धोका निर्माण झाल्याचे निंभारे यांनी सांगीतले.

दुरूस्तीसाठी ५१.७१ कोटीची गरज

पाटबंधारे उपविभाग १ मधील २ मध्यम आणि २० लघु प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी १५.५६ कोटी रूपये, उपविभाग २ मधील १ मध्यम आणि १५ लघु प्रकल्पांसाठी १३.७६ कोटी, उपविभाग ३-कन्नडमधील २ मध्यम आणि १६ लघु प्रकल्पांसाठी ६.१४ कोटी, उपविभाग ४-कन्नडच्या २ मध्यम आणि ४ लघु प्रकल्पासाठी ६.१५ कोटी तर उपविभाग ५-सिल्लोडच्या ३ मध्यम आणि १४ लघु प्रकल्पांसाठी १०.१० कोटी रूपये लागणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १० मध्यम आणि ६९ लघु प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी ५१.७१ कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

तात्काळ दुरूस्तीची गरज

सिंचन वर्ष २०२१-२२ चा रबी आणि उन्हाळी हंगाम राबवण्याकरिता अतीवृष्टीमुळे झालेले नुकसान दुरूस्त करणे अत्यावश्यक आहे. कालव्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पाणी जाण्यासाठी तसेच धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कामे तात्काळ करावी लागतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे.

- ए.एम.निंभोरे, कार्यकारी अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे विभाग

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com