राज्यातील 50 हजारावर खेड्यात आरोग्य सुविधा नाहीत!

खंडपीठात याचिका दाखल
राज्यातील 50 हजारावर खेड्यात आरोग्य सुविधा नाहीत!

औरंगाबाद - Aurangabad

राष्ट्रीय आरोग्य योजनेनुसार (National Health Plan) तीन हजार लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र, 20 हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र व चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना सार्वजनिक आरोग्य केंद्र अर्थात ग्रामीण रुग्णालय असणे अपेक्षित आहे. मात्र महाराष्ट्रात ग्रामीण भागात 60 टक्के नागरिक राहत असताना 63 हजार 663 खेड्यांपैकी 50 हजार खेड्यांमध्ये आरोग्याची कुठलीही यंत्रणा नाही. अशी आरोग्य यंत्रणेची भयानक अवस्था आहे, अशी माहिती मांडणारी जनहित याचिका (Mumbai High Court) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर (MLA Babanrao Lonikar) यांनी दाखल केली आहे. 

या प्रकरणी न्या. एस.व्ही. गंगापूरवाला (Justice S.V. Gangapurwala) व न्या. आर.एन. लड्डा (Justice R.N. Ladda) यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य संचालक, औरंगाबादचे उपसंचालक, जालना जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जालन्याचे सार्वजनिक अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

अ‍ॅड. अमरजितसिंग गिरासे यांच्या मार्फत दाखल याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य हा विषय सर्वांच्या चिंतनाचा आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आरोग्य विषयातील समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जनहित याचिका दाखल केली असून राष्ट्रीय आरोग्य योजनेनुसार यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अतिशय भयानक आहे. जालना जिल्ह्यात 43 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी केवळ 5 ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. अर्थात 39 आरोग्य केंद्रांना प्रयोगशाळा नाहीत व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाहीत. वैद्यकीय अधिकार्‍यांची 103 पदांपैकी केवळ 49 पदे भरलेली आहेत व 54 पदे रिक्त आहेत. पुरुष आरोग्य सेवकांच्या 270 पदांपैकी 104 पदे रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांपैकी 170 पदे रिकत आहेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा करावी, अशी विनंती याचिकेतून केलेली आहे.

सरकारी आरोग्य केद्रांत औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, परिचर, कनिष्ठ सहायक, अशी सर्व पदे रिक्त आहेत. शासन रिक्त पदे भरणार अशी घोषणा करते, परंतु त्यातील अनेक पदे न भरल्यामुळे व्यपगत झालेली आहेत. प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावरील ग्रामीण सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय वाईट आहे. तेथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, परिचर, कनिष्ठ सहायक, अशी पदे रिक्त आहेत. रुग्णवाहिकी, सिटी स्कॅन मशीन, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रकल्प, पर्याप्त औषध साठा उपलब्ध नाही. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी व रुग्णांसाठी तालुका व जिल्हा रुग्णालय वा खासगी दवाखान्यांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com