Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकोरोनामुळे राज्यात 5 हजार मुलांनी गमावले आई-वडिलांचे छत्र!

कोरोनामुळे राज्यात 5 हजार मुलांनी गमावले आई-वडिलांचे छत्र!

औरंगाबाद- Aurangabad

कोरोनामुळे वर्षभरात देशभरात 26 हजार बालकांनी आई किंवा वडील यापैकी एकाला गमावले. राज्यात ही संख्या 5 हजाराहून अधिक आहे. या बालकांच्या भविष्यासाठी राज्य आणि केंद्राने विविध योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यांना खरी गरज वर्तमानासाठी असून त्यासाठी गरजूंचा शोध घेण्याची गरज तज्ञांनी वर्तवली आहे. 

- Advertisement -

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याबाबत सोशल मिडीयावर अनेक चूकीचे मेसेज व्हायरल झाले होते. यातून मानवी तस्करी धोका निर्माण झाला. यामुळे अशा मुलांसाठी धोरणे ठरवण्याची मागणी करत काही स्वंयसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात कोरोनामुळे दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या बालकांची आकडेवारी समोर आली.

राज्यात 5 हजार बालके

आयोगाच्या अहवालानुसार देशभरात 1 एप्रिल 2020 ते 30 मे 2021 दरम्यान कोरोनामुळे 3621 बालके अनाथ झाली. तर 26,176 मुलांच्या डोक्यावरुन आई किंवा वडिलांचे छत्र हरपले. राज्यात 5,172 मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला गमावले.

सर्वाधिक मुले महाराष्ट्रात

कोरोनासोबत विविध कारणांने 13 महिन्यात देशात 30,071 बालकांनी आई किंवा वडील गमावले. यात 15,620 मुले तर 14,447 मुली आहेत. 11,815 बालके 8 ते 13 तर 5,107 बालके 4 ते 7 वयोगटातील आहेत. सर्वाधिक महाराष्ट्रात 7084, उत्तर प्रदेश 3172, राजस्थान 2482, हरियाणा 2438, मध्य प्रदेश 2243 तर केरळमध्ये 2002 बालके अनाथ झाली.

भविष्याची तरतूद, आजची चिंता

या बालकांसाठी राज्यातर्फे पदव्युत्तर पर्यंतचे मोफत शिक्षण आणि दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या नावे वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत 5 लाख रुपयांची एफडीची सोय केली. केंद्रातर्फे वयाच्या 18 व्या वर्षापासून मासिक भत्ता, वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी कर्ज तसेच 5 लाखाचा आरोग्य विमा देवू केला आहे. सरकाराने मुलांचे भविष्य सुरक्षित केले, पण त्यांची आजची चिंता संपली नसल्याचे कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या रेणूका कड यांचे मत आहे.

कशी शोधणार बालके?

सरकारी योजनेत मुलांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या पालकांचा कोरोनामुळेच मृत्यु झाला आहे हे सिद्ध करावे लागेल. काहींचा थेट कोरोनामुळे तर काहींचा कोरोनातून बरे होवून घरी आल्यावर वेगवेगळ्या कारणाने मृत्यु झाला आहे. काहींच्या मृत्यु प्रमाणपत्रावर कोरोनामुळे मृत्यु अशी नोंद नाही. अनेकांना याेजनांची माहिती नाही. यामुळे त्या लाभार्थीपर्यंत कशा पोहचणार, असा रेणूका कड यांचा प्रश्न आहे.

शिकायचे कसे?

चिकलठाणा भागातील खाजगी कंपनीतील राजेश यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. कंपनीने त्यांच्या जागी पत्नीला नोकरीवर घेतले. मात्र, पुरेसे शिक्षण नसल्याने 12 हजारावर काम करावे लागले. दहावीत असणारा मुलगा आयआयटीचे स्वप्न बघतोय. त्याचे दहावीचे क्लास, आयआयटीचे तयारी वर्ग कसे करावे याची आईला चिंता वाटतेय.

भीक मागण्याची वेळ

उस्मानपुऱ्यातील एका मॉल बाहेर पिशव्यांमध्ये सामान गोळा करणाऱ्या सुरजची आई दोन वर्षांपूर्वी वारली. वडील सिक्युरीटी गार्डचे काम करायचे. मार्चमध्ये कोरोनाने निधन झाले. सुरजची जबाबदारी आत्याने स्विकारली. त्याला नवीन मित्र झाले. ते मॉलबाहेर उभे राहतात. लोकं त्यांना बिस्कीट, ब्रेड, वेफर्स, पैसे देतात. दिवसभरात पिशवी भरून जाते. शाळा सुरू झाल्यावर बघू, आता घरी बसून तरी काय करणार? असे आत्या विचारते.

आजचा दिवस धकला, पुढे काय?

मयुरनगर येथील कंपनी कामगार काकासाहेबांचे मार्चमध्ये निधन झाल्यावर 2 मुलांसह आई सुशीला उघड्यावर आली. कोणी मदतीला तयार नाहीत. पतीच्या कंपनीने वर्षभराचा पगार दिला. त्यात दिवस निघताय. पण त्या नंतर कसे करायचे, हा सुशीला यांच्यासमोर प्रश्न आहे.

प्रत्येकाला लाभ मिळावा

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी सरकारची धोरणे चांगली आहेत. ती गरजूंपर्यंत पोहचायला हवीत. त्यासाठीच्या अटी किचकट आहेत. गरजुंचा शोध घेण्यासाठी सरकारने खास टीम तयार कराव्यात. भविष्यासोबतच मुलांचे वर्तमान चांगले रहावे, यासाठी विशेष पाऊले उचलण्याची गरज आहे.

– रेणूका कड, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट

- Advertisment -

ताज्या बातम्या