Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकुणी लस घेतं का, लस ? 35 हजार लसींचा साठा पडून

कुणी लस घेतं का, लस ? 35 हजार लसींचा साठा पडून

औरंगाबाद – Aurangabad

कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेने शहरात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताच 45 वर्षावरील नागरिकांकडून लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. अनेक केंद्रांवरुन एकही लस घेतली जात नसल्याने लसींचे बॉक्स तसेच परत येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुणी लस घेतं का लस! असे म्हणण्याची वेळ आता पालिकेवर आली आहे. परिणामी, 35 हजार लसींचा साठा पालिकेकडे अद्यापही पडून आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर औरंगाबाद पालिकेने शहरातील नागरिकांसाठी जम्बो लसीकरण मोहीम हाती घेत 115 वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू केले. मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झालेली असताना लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तेव्हा लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी पहायला मिळाली. मात्र तेव्हा लसींची मागणी मोठया प्रमाणावर असतानाही पुरवठा कमी होत होता.

दरम्यान, राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करताना कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस केले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी अचानक कमी झाली. त्यातच आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यातच दुसरी लाट ओसरताच 45 वर्षांवरील नागरिकांचा प्रतिसादही कमी झाला आहे. परिणामी, पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट दिसून येत आहे. अनेक केंद्रांवर दिवसभरात एकही लस दिली जात नसल्याचेही समोर आले आहे.

45 वर्षावरील नागरिकांच्या पहिल्या व दुसर्‍या डोसकरिता पंधरा दिवसात राज्य सरकारकडून 41 हजार लस मिळाली आहे. त्यात 26 मे रोजी 11 हजार 200, 28 मे रोजी 7 हजार 900, 1 जून रोजी 1 हजार 850, 3 जून रोजी 11 हजार 100, 9 जून रोजी 8 हजार 550 या प्रमाणे 40 हजार 600 लसींचा पुरवठा झाला आहे. अगोदर पालिकेकडे 8 हजार लस शिल्लक होती. गेल्या पाच दिवसात केवळ 5 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे 35 हजार लसींचा साठा अजून पडून आहे.

पालिकेने 45 वर्षावरील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व नोकरीला जाणार्‍या नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. त्यासोबतच कारमध्ये या लस घ्या ही ड्राईव्ह इन ही मोहिम हाती घेतली आहे. तसेच दिव्यांग, बेघर आणि ओळखपत्र नसलेल्या नागरिकाचेही लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेलाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आता केंद्र सरकारने विदेशात शिक्षणाला जाणारे विद्यार्थी व नोकरीला जाणार्‍या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 28 दिवसानंतर परवानगी दिली आहे.

45 वर्षे वयोगटातील सुमारे अडीच लाख नागरिक लसीकरणापासून दूर आहेत. या नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर यावे यासाठी पालिकेने आता जगजागृती मोहीम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी चेतना सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. तसेच पॉम्प्लेट, स्टिकरचे वाटप केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या