'ते' १६ जण अपात्र ठरल्यास काँग्रेसचे २२ आमदार शिंदे गटात!

उद्धव गटाच्या खैरेंचा दावा
'ते' १६ जण अपात्र ठरल्यास काँग्रेसचे २२ आमदार शिंदे गटात!

औरंगाबाद -aurangabad

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जर शिंदे गटातील १६ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याने अपात्र ठरवले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळी फिल्डिंग आधीपासूनच लावून ठेवली आहे. त्यांनी काँग्रेसचे २२ आमदार शिंदे गटात सहभागी करून घेण्याची योजना आखली आहे. काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा सुरू असल्याने त्या २२ आमदारांना वेट अँड वॉचवर ठेवले असल्याचा खळबळजनक दावा उद्धव गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेले आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आता गौप्यस्फोट केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा मोठा दावा खैरे यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे २२ आमदार कुठले आणि कोण आहेत? हे मात्र चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं नाही. पण काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सध्या शांत आहेत, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com