
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
दहा वर्षीय मुलीवर बळजबरीने अत्याचार करणारा नराधम विशाल उर्फ रॉकी मिलिंद पारधे (२८, रा. सिडको) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली.
शहरातील सिडको परिसरात राहणारी दहा वर्षीय पीडिता ही बालपणापासून आजीकडे राहते. तसेच ती इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेते. दरम्यान ४ जून २०१९ रोजी पीडितेच्या आजीचे नातेवाईक उपचारासाठी घाटी रुग्णालयात आले होते. त्यामुळे नातेवाईकांना भेटण्यासाठी आजी घाटीत गेली होती, पीडितेचे वडील देखील रिक्षा घेऊन बाहेर गेले होते. पीडिता एकटी घरी असल्याची संधी साधत आरोपी विशाल पारधे याने पीडितेला बळजबरी तोंड दाबून गच्चीवर नेले. तेथे पीडितेवर त्याने अत्याचार केला. पीडितेने विरोध करत आरडाओरडा केला असता आरोपी पारधे याने, 'तू जर घडलेली घटना घरी सांगितली, तर तुला बाहेर मारून टाकीन', अशी धमकी दिली. त्याचवेळी रुग्णालयात गेलेली पीडितेची आजी घरी आली. पीडिता घरात न दिसल्याने आजीने तीचा शोध सुरू केला. तेव्हा पीडिता गच्चीवरून रडत-रडत खाली येताना दिसली. आजीने नातीला जवळ घेत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला प्रकार आजीला सांगितला. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात आरोपी पारधे विरोधात भादंवि ३७६ कलमासह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उप निरीक्षक एम.एस. बकाल यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाअभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ (अ,ब) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्वये सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ४ (२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड तसेच पोस्को कलम १२ अन्वये वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.