
औरंगाबाद - aurangabad
एमआयडीसीमध्ये (midc) नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका युवकास लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलेविरुद्ध गुरुगोविंदसिंहपुरा पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम माझा मुलगाच बघतो, अशी थाप ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेने मारली होती. ही बाब उद्योग मंत्री सामंत यांना समजताच त्यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
एमआयडीसी विभागाचे अधिकारी अशोक रसाळ यांच्या तक्रारीवरून उद्योगमंत्री सामंत यांच्या नावाचा गैरवापर करत फसवणूक केल्याप्रकरणी त्या महिलेविरोधात गुरुगोविंदसिंहपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. केदार काटे हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम पाहत असून त्यांची खूप मोठी ओळख असल्याचे सांगत संदीप कुलकर्णी व दिलीप कुलकर्णी यांचा विश्वास संपादित केला. कुलकर्णी यांच्या भाच्यास नोकरीची गरज असल्याने त्यांनी त्या महिलेवर विश्वास ठेवला. याचा फायदा घेत एमआयडीसीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेने रोख २० लाख रुपये घेतले तसेच उर्वरित पाच लाख रुपये नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर देण्याचा करारनामाही करून दिला.
गुन्हे दाखल करा
या फसवणूक प्रकरणाची माहिती मिळताच उद्योगमंत्री सावंत यांनी या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कुलकणीं यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच औद्योगिक विकास महामंडळाची बदनामी केली. उद्योगमंत्री व शासनाची प्रतिमा मलीन करून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी अशोक रसाळ यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.