Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का?

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का?

औरंगाबाद – Aurangabad

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याने मान्य करणार का? असा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारने उंटावरून शेळ्या हाकू नये अशी टीका मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

फेसबुक व टिट्‌रच्या माध्यमातून आमदार सतीश चव्हाण यांनी आज एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पीएम केअर फंडातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची मी गुरूवारी पाहणी केली होती.

पीएम केअर फंडातून घाटी रूग्णालयाला 150 व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर निकृष्ट असून कोरोना रूग्णांच्या वापरायोग्य नाहीत, आयसीयू कक्षात लावण्याच्या दजार्च नाहीत असा स्पष्ट अहवाल घाटी रूग्णालयाने यासंदर्भात नियुक्त केलेल्या घाटीतील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला आहे. सदरील प्रश्नाला मी पुराव्यानिशी वाचा फोडल्यावर यासंदर्भात विविध दैनिके, टी.व्ही.चॅनल्सवर बातम्या प्रसिध्द झाल्या.

याची दखल केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाला घ्यावी लागली. मात्र यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी प्रेस नोट प्रसिध्द करून औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयातील व्हेंटिलेटर संदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्या निराधार, चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. घाटीतील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने प्रत्यक्ष व्हेंटिलेटरची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला. मग घाटीतील तज्ञ डॉक्टरांचा अहवाल खोटा की केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली प्रेस नोट खोटी? असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे यावरूनन तरी दिसून येत आहे. पीएम केअर फंडातून औरंगाबादला दिलेले व्हेंटिलेटच बिनकामाचे निघालेत असे नाही तर पंजाब, राजस्थान या राज्यांना पीएम केअर फंडातून देण्यात आलेली व्हेंटिलेटर सदोष व बिनकामाचे निघालेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत यांनी देखील सदोष व्हेंटिलेटर पुरविल्याच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तरी देखील केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करून गुजराती कंपनीवर मेहेरनजर का होत आहे? मेक इन इंडियाच्या नावाखाली लोकांचे जीव घेणार का? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत. मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी हे पीएम केअरचे व्हेंटिलेटर पुरविण्यात आले त्याठिकाणी मी लवकरच भेट देऊन किती व्हेंटिलेटर उपयोगात आली, किती बिनकामाची निघाली याची माहिती घेणार आहे. अनेक ठिकाणी लोकांना व्हेंटिलेटर अभावी जीव गमवावा लागतोय. इतक्या महत्वाच्या वैद्यकीय उपकरणाविषयी आपले आत्ममग्न केंद्र सरकार इतके उदासीन, संवेदनाहीन वागत असेल तर देशातील नागरिकांनी दाद तरी कुणाकडे मागायची? असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

देशातील कोविडच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएम केअर फंडातून अनेक राज्यांना दिलेले व्हेंटिलेटर बिनकामाचे असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या घटनेची दखल घेतली असून औरंगाबादसह इतर राज्यांना पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याच्या सुचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या असल्याचे समजते. या गंभीर घटनेची दखल घेतल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यातून भाजपचे नेते योग्य तो बोध घेऊन राज्य सरकारवर उठसुठ टीका करणार नाहीत असा टोला आ.सतीश चव्हाण यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या