दामदुपटीचे आमिष; 12 लाखांचा घातला गंडा

आरोपी अटकेत
दामदुपटीचे आमिष; 12 लाखांचा घातला गंडा

औरंगाबाद - Aurangabad

युटूव्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत (Online Private Limited Company) गुंतवणूक केल्यास दामदुपटीने परतावा मिळेल असे आमिष दाखवून 17 ठेवीदारांना 12 लाख 11 हजार 150 रुपयांना गंडा (Fraud) घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सतीश श्रीपत तिवारी (48, रा. उत्तर प्रदेश) याला औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली (Aurangabad Economic Crimes Branch) . या गुन्ह्यात यापूर्वी आरोपीचे साथीदार तसेच कंपनीचा एमडी नवलकिशोर पांडे आणि कंपनीची सभासद सुनिता करमाकर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

समर्थनगरातील तेजस्विनी सुधाकर गायकवाड (38) यांनी मार्च 2018 मध्ये वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीवरून युटूव्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी कंपनीचा सीएमडी असल्याचे सांगून सतीश तिवारी, जागृती देसाई, सुनिता करमकर, नवलकिशोर पांडे आणि कमल श्रीनिवास यांनी गायकवाड यांना आपल्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी दामदुपटीचे आमिष दाखवले.

आमिषाला बळी पडून गायकवाड यांनी एक लाख 72 हजार सहाशे रुपये गुंतवले होते. सुरुवातीच्या काळात कंपनीने गायकवाड यांना 16 हजार 200 रुपये परतावा दिला. परंतु, त्यानंतर तिवारी याने परतावा देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली. तसेच तिवारी याने गायकवाड यांना दिलेले धनादेशही वटले नाहीत. या प्रकरणात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्‍ह्याच्‍या तपासादरम्यान मुख्‍य आरोपी सतीश तिवारी याने 17 ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. आरोपीविरोधात उल्‍हासनगर पोलीस ठाण्‍यात अशाच प्रकारचा गुन्‍हा दाखल आहे, त्‍यात पोलिसांनी त्‍याला अटक केली. त्‍यांनतर औरंगाबाद आर्थिक गुन्‍हे शाखेने त्‍याला अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com