खुशखबर : औरंगाबादमध्ये सुरू होणार 12 सीएनजी पंप

इंडियन ऑईलने केली तयारी
खुशखबर : औरंगाबादमध्ये सुरू होणार 12 सीएनजी पंप

औरंगाबाद - Aurangabad

शहरात सीएनजी (CNG) पंपांचे जाळे विस्तारण्यासाठी सज्ज असून आता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) 12 सीएनजी पंप सुरू करणार आहे. येथे पोहचलेल्या सीएनजी पाईपलाईन मधूनच इंडियन ऑईलला या इंधनाचा पुरवठा होईल. सीएनजीला अजून वर्ष लागणार असले तरी इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगची समस्या आता सुटली आहे. मराठवाड्यातील पहिल्या ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनला शुक्रवारी सुरूवात झाली.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित "आज़ादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमा अंतर्गत इंडियन आईल कॉर्पोरेशनने महाराष्ट्र व गोव्यातील पहिला आर्दश पेट्रोल पंप म्हणून "दक्षता पेट्रोल पंप' ची घोषणा केली. कंपनीचे कार्यकारी संचालक आणि दोन्ही राज्याचे प्रमुख अनिर्बन घोष यांनी ऑनलाईन प्रणालीने हे नाव जाहीर केले. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांमार्फत हा पंप चालवला जातो. या प्रसंगी कंपनीचे महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार श्रीवास्तव, औरंगाबादचे विभागीय प्रमुख राकेश सरोज, पोलिस उपअधिक्षक डॉ. विशाल नेहूल आदींची उपस्थिती होती. चिकलठाणा विमानतळासमोर हा पंप आहे.

"सीएनजी'साठी आग्रही

कंपनीचे महाव्यवस्थापक अजय कुमार श्रीवास्तव म्हणाले, भारत गॅस रिसोर्स लिमीटेडने शहरात सीएनजी पाईपलाईन टाकण्यास सुरूवात केली आहे. इंडियन ऑईल या यंत्रणेचा वापर करून 12 पंपांवर सीएनजी पुरवणार आहे. पैकी पहिल्या टप्प्यात 5 पंप सुरू होईल. सीएनजी लाईन सुरू झाल्यावर अजून प्रस्ताव मागवू. कंपनी सीएनजीचा अधिकाधिक पुरस्कार करण्यासाठी आग्रही आहे, असे त्यांनी सांगीतले. भारत पेट्रोलियमही 60 पंपावर सीएनजी पुरवणार आहे.

ई-चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन

मराठवाड्यातील पहिल्या ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन यावेळी झाले. श्रीवास्तव म्हणाले, 2019 पासून सर्व पंपावर किमान एका अपारंपारीक इंधनाची सोय असावी, असे सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने कंपनीने महाराष्ट्र आणि गोव्यात 14 चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. मराठवाड्यात लवकरच 5 सुरू होतील. तर चालु आर्थिक वर्षात राज्यात 100 तर मराठवाड्यात 20 स्टेशन सुरू केले जातील. या उद्घाटनाद्वारे राज्यात इंडियन आईलच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

Related Stories

No stories found.