Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना मदतीचे आदेश

Share

सुट्ट्या संपल्याने पंचनाम्याच्या कामास वेग येणार, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई, अहमदनगर – नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. या आदेशामुळे नगर जिल्ह्यात सोयाबीन, बाजरी, कापूस, मका पिकांचे तसेच द्राक्ष, पेरू, डाळिंब व अन्य फळबागांना फटका बसला आहे. अशा शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तात्काळ मदत केली आहे. सध्या काही भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून तसे आदेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, याची दखल घेत सचिवांनीही सर्व जिल्ह्याधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेतली. व याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. आता दिवाळीची सुट्टी संपल्याने पंचनाम्याच्या कामास सुरूवात झाली असून त्याला आणखी वेग येणार आहे.
देशातून मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये नाशिक, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल 13 लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे सुमारे आठ हजार 790 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यात सोयाबीन, बाजरी, कापूस, मका पिकांचे तसेच द्राक्ष, पेरू, डाळिंब व अन्य फळबागांना फटका बसला आहे. या परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा घास हिरावून घेतला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार झालेल्या पंचनाम्याचे अहवाल मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांकडे प्राप्त झाल्यानंतर मदतीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केंद्रीय पथकांकडून केली जाणार आहे. त्यासाठी किमान तीन पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी एनडीआरएफ मधून भरपाई दिली जाणार आहे.

शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने पोहच पावती – 
पिकविमा व झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीने शेतकरीनिहाय तक्रारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार शेतकरी तक्रारी करण्यास गेले असता तेव्हा तक्रारी स्वीकारल्या जात होत्या. पण त्याची पोहच दिली जात नव्हती. त्याव शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आक्षेप घेतला. जो अधिकारी होता. त्याच्याकडे विमा कंपनीचे शिक्के नव्हते. यासंदर्भात अनिल औताडे यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला पण फारसा उपयोग झाला नाही. शेवटी कृषी अधिकार्‍यांकडे त्यांनी याबाबत गार्‍हणी केली. त्याची दखल घेऊन उपविभागीय अधिकार्‍यांनी सर्व कृषी सहाय्यकांंच्या सहाय्याने सर्व शेतकर्‍यांना पोहच पावत्या दिल्या.

जिल्ह्यात 156 टक्के पाऊस
टाकळीभान, नेवासा मंडलांत सर्वाधिक 960 मिमी
नगर जिल्ह्यात 30 ऑक्टोबर 2019 अखेर तब्बल 156 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 308 टक्के पाऊस अकोलेत झाला. त्याखालोखाल संगमेनर 184, श्रीरामपूर 191, नेवासा 181, नगर 146, राहाता 154,पारनेर 141, कोपरगाव 139, राहुरी 136, श्रीगोंदा 134, पाथर्डी 140, शेवगाव 136, कर्जत 103, जामखेड 105.06 टक्के.
श्रीरामपुरातील टाकळीभान मंडलात सर्वाधिक 960 तर नेवासा खुर्दमध्ये 960, रवंदे 946, श्रीरामपूर 902, घारगाव 881, संगमनेर 770, वडाळा बहिरोबा 738, सोनई 718, नालेगाव 764, भिंगार 786, सावेडी 774, पाथर्डी 774, टाकळीमानूर 754,शेवगाव 770, वांबोरी 717, पुणतांबा 766, सुरेगाव 719 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या मंडळात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अकोले तालुक्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने त्याचा तडाखा बसला आहे. 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!