बैलाने गिळलेले गंठण शस्त्रक्रिया करून काढण्यात पशुवैद्यकांना यश

0
बेल्हेकरवाडी येथील शिंदे यांच्या बैलाने गिळलेले सोन्याचे गंठण शस्त्रक्रिया करुन काढताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. दरंदले.

पोळ्याच्या पूजेवेळी केले होते गिळंकृत

सोनई (वार्ताहर) – बैल पोळ्याच्या पूजेच्यावेळी बैलाने साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण गिळल्याची घटना बेल्हेकरवाडी येथे घडली. हे गंठण शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर बैल सुखरूप आहे. याबाबत माहिती अशी की, बैलपोळा हा बळीराजाचा आनंदाचा सण. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांची सजावट करून या दिवशी त्याची मनोभावे पूजा करतात. रविवारी पोळ्याच्या दिवशी सोनई जवळील बेल्हेकरवाडी येथे भाऊसाहेब गणपत शिंदे यांच्या घरी बैलांची पूजा करताना मलिदा खाऊ घालण्याच्या ताटात बैलाला ओवाळण्यासाठी शिंदे यांच्या पत्नीचे साडेतीन तोळे वजनााचे सोन्याचे गंठण ठेवण्यात आले होते. बैलपूजा, आरती झाली. त्याच ताटात असलेला पुरणपोळी-गुळाचा मलिदा खात असताना बैलाने ते सोन्याचे गंठणही गिळून घेतले.

सर्व पूजा, आरती झाल्यानंतर शिंदे कुटुंबीयांच्या ही गोष्ट लक्षात आली. धावपळ करुन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. दरंदले (ब्राह्मणी) यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्व घटना समजावून घेऊन बैलाची पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शिंदे यांच्या बैलाच्या पोटाची सुमारी दीड तासाची यशस्वी शस्त्रक्रिया करून हे सोन्याचे गंठण बाहेर काढण्यात आले. बैलाच्या पोटावर टाके घालून औषधोपचार करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. शिंदे कुटुंबाला आपला लाडका बैल सुखरुप दिसला. तसेच सोन्याचे गंठणही सरपंच भरत बेल्हेकर यांचे हस्ते शिंदे यांना देण्यात आले.

पशुवैद्यकीय अधिकारी बी. बी. दरंदले यांचे ग्रामस्थांनी कौतुक करुन आभार मानले. सरपंच बेल्हेकर यांचे हस्ते डॉ. दरंदले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम शिंदे, हरिभाऊ पवार, रामभाऊ शिंदे, नाना ाचकर, जनार्धन बेल्हेकर, संकेत शिंदे, ज्ञानेश्‍वर येळवंते, सचिन शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*