‘नमो उद्यान’ नामकरणास सेनेचा विरोध

छ.शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी ५ कोटी रु. निधी देण्याची तयारी

0
नवीन नाशिक | दि. ६ प्रतिनिधी- पेलीकन पार्कचा न्यायालयीन वाद संपुष्टात येऊन या जागेच्या विकासाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात असताना त्या संदर्भात दररोज नवीन वादाला तोंड फुटत असून पेलीकनचा प्रश्‍न सुटण्यापूर्वीच अधिकच अवघड होत चालला आहे.

भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करून भाजपांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आणल्यानंतर या संघर्षात आता शिवसेनेनेही उडी घेतली असून पेलीकन पार्कचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्यास विरोध दर्शविला आहे.

या संदर्भात प्रभाग क्र. २७च्या नगरसेविका किरण गामणे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेलीकन पार्कचा प्रश्‍न धूळ खात पडला असताना आता कायदेशीर बाबी संपुष्टात आल्यानंतर पेलीकन पार्कचे रुपांतर नवीन उद्यानात करण्याच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.

सत्ताधारी पक्षाकडून या नवीन उद्यानास ‘नमो उद्यान’ नामकरण करण्याचा घाट घातला जात असून एका पक्षाच्या नेत्याच्या नावावरून नामकरणास व्यक्तीश: आमचा व शिवसेनेचा विरोध आहे. प्रभागातील नागरिकांचीही तशी इच्छा असून या उद्यानास छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून ओळखले जावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय उद्यानाच्या विकासकामाला अधिक गती मिळावी या हेतूने शिवसेनेच्या वतीने ५ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या इच्छेविरोधात नामकरणाचा प्रयत्न केला गेल्यास नागरिकांसह शिवसेनेच्यावतीने तीव्र विरोध प्रकट करून सत्ताधारी पक्षाच्या नेते-पदाधिकार्‍यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर किरण गामणे यांची सही आहे.

 

पेलीकन पार्कच्या विकासाची प्रक्रिया न्यायालयीन संघर्षाच्या चक्रव्युहात अडकलेली होती. वर्षानुवर्षे अनेकांनी प्रयत्न करूनही त्यात कोणालाच यश मिळाले नाही. मात्र भाजपाच्या काळात हा प्रश्‍न मार्गी लागला असताना विनाकारण वाद-विवाद निर्माण केले जात आहेत. मुळात पेलीकनच्या जागेचा विकास व्हावा व ती जागा नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध व्हावी हाच मुख्य उद्देश आहे. नाव काय ठेवायचे? हा प्रश्‍न नंतरचा आहे. त्यासाठी महापालिकेची समिती आहे. ती निर्णय घेईल. आधी काम सुरू होणे गरजेचे आहे व मी त्यासाठीच प्राधान्य दिले आहे.
– सीमा हिरे (आमदार, नाशिक पश्‍चिम)

 

 

अनुत्तरीत प्रश्‍न?
* नगरसेविका किरण गामणे यांनी पेलीकन पार्क प्रश्‍नाबाबत घेतलेली भूमिका ही शिवसेना पक्षाची भूमिका आहे का?
* एखाद्या विकासकामासाठी यापूर्वी शिवसेनेने अधिकृतपणे असा निधी दिला आहे का?
* पेलीकन पार्कसाठी शिवसेना ५ कोटी रुपये कसे व कोठून देणार?
* जर पक्षीय पातळीवरून विकासकामांना निधी दिला जात असेल तर यापूर्वी शिवसेनेने स्वत: किती व कोणत्या विकासकामांसाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

*