रक्त सांडले तरी बेहत्तर, जमीन देणार नाही

0

समृद्धी महामार्ग विरोधी परिषदेत शेतकर्‍यांचा निर्धार

औरंगाबाद – मागणी नसताना आणि नागपूरहुन मुंबईकडे जाण्यासाठी अगोदरच तीन मार्ग शिल्लक असताना नव्या महामार्गांची निर्मिती कशासाठी करायची असा सवाल करतानाच, पैसा पुरत नाही आणि जमिन सरत नाही त्यामुळे रक्त सांडले तरी बेहत्तर पण समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नसल्याचा निर्धार शेतकर्‍यांनी सोमवारी औरंगाबादेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्ग शेतकरी विरोधी परिषदेत नगरसह दहा जिल्ह्यांमधून आलेल्या शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
नागपूर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी तीन महामार्ग सध्या अस्तित्वात आहेत. यातील रसत्यांच्या चौपदरीकरणाला मंजुरी असताना त्याचे काम रखडले. असे असताना नव्या मार्गांसाठी कोणतीही मागणी नाही. समृद्धी प्रकल्पाच्या विरोधात रक्त सांडले तरी बेहत्तर पण इंचभरही जमीन देणार नसल्याचा निर्धार या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी या परिषदेत केला.

समृद्धी महामार्ग विरोधात शेतकर्‍यांची रीट याचिका
प्रस्तावित मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर होत असलेल्या भूसंपादनाला विरोध करणारी रीट याचिका नाशिकमधल्या शेतकर्‍यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. भूसंपादनामुळे शेतकर्‍यांना सुपीक जमिनी गमवाव्या लागतील असे या याचिकेत म्हणण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या महामार्गांवरच समृद्धी महामार्ग करण्यात यावा असेही या याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलंय.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्राम पंचायतीतल्या शेतकर्‍यांनी ही रीट याचिका केली आहे. किरण हरक, भास्कर वाघ, सोमनाथ यांनी ही याचिका दाखल केली आहे. या संदर्भात याचिका दाखल केली असल्यानं राज्य सरकार आणि नाशिक जिल्हाधिकार्‍यांना भूसंपादन करण्यासाठी मनाई करण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सध्या तीन महामार्ग असताना हा चौथा मार्ग कशासाठी?
सध्या तीन महामार्ग असताना हा चौथा मार्ग कशासाठी? असा सवाल करतानाच आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही. मात्र, त्याला मानवी चेहरा असावा. ज्या विकासाला मानवी चेहरा नाही, तो विकास काय कामाचा, असा प्रश्न उपस्थित करत ‘समृध्दी महामार्गाला मानवी चेहरा नसल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. ती भावना येथे दिसली,’असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी व स्थानिक प्रतिनिधींशी पवार यांनी संवाद साधला. समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी, व राज्य सरकार यांच्यात आपण चर्चा घडवून आणणार आहे.

सध्या तीन महामार्ग असताना हा चौथा मार्ग कशासाठी? जुन्या मार्गाची दुरुस्ती, यांसह अन्य काही पर्याय शोधण्याबाबत विनंती करण्यात येईल. राज्यातील पुनर्वसना संदर्भातील अनुभव वाईट आहेत. 1952 साली कोयना धरण झालं. त्यांना आता जमिनी मिळाल्या आहेत. ज्यांचं 4 वर्षांपूर्वी पुनर्वसन झालं. आता त्यांच्याच जमिनी पुन्हा समृद्धी महामार्गामध्ये जात आहेत. पुनर्वसनाचा अनुभव चांगला नाही. लोक उगाचच विरोध करत नाहीत, असे पवार यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*