फक्त 54 हजार विद्यार्थीच गणवेशात!; जि.प.कडून शाळांना चार दिवसांपूर्वी 9 कोटी

0

नाशिक । शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश नाहीत. पालकांनी गणवेश खरेदी करून त्याचे बिल शाळांना सादर केल्यानंतर त्या गणवेशाच्या खरेदीपोटी लागलेले पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 54 हजार विद्यार्थ्यांच्या अंगावर नवीन गणवेश आहेत.

विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळावेत म्हणून जिल्हा परिषदेने यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यावर दोन गणवेशापोटी खरेदीची रक्कम म्हणून 400 रुपये जमा करण्याची पद्धत अवलंबली आहे. याचा उलटा परिणाम यंदाच्या शैक्षणिक सत्रात झाला. अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चित्र रंगीबेरंगी कपड्यात येणारे विद्यार्थी असे आहे.

अगोदर पालकांनी पाल्यांसाठी गणवेश खरेदी करायचे, त्याचे बिल घेऊन ते शाळांना देणे आणि त्यानंतर शाळांनी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेत टाकणे, असा हा सोपस्कार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पालकांना शैक्षणिक सत्राच्या आरंभी सांगितला नव्हता. पाल्यांना शाळेतून गणवेश मिळतील या आशेवर राहिलेल्या पालकांनी शैक्षणिक सत्राच्या आरंभी मुलांना गणवेश घेऊन दिले नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांचा हिरमोड झाला.

ऐनवेळी बँकेत खाते उघडणे, त्यासाठी बँकेत शिल्लक रक्कम ठेवणे, त्यानंतर गणवेश खरेदी करून त्याचे बिल सादर करण्यासाठी पालकांनी नंतर हालचाल केली. मात्र हे सोपस्कार करूनही अनेक पालकांना गणवेशाचे 400 रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नसल्याचा अनुभव आला होता. कारण शिक्षण विभागाकडून शाळांच्या खात्यावरच गणवेशापोटी देण्यात येणारी रक्कम वर्ग झाली नव्हती. ती आता चार दिवसांपूर्वी वर्ग करण्यात आली. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांनी गणवेश घेतले त्यांच्या खात्यावर 400 रुपये वर्ग करण्यात येतील, असे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*