गावांचा कारभार ऑनलाईन

0

ग्रामपंचायतींच्या व्यवहारात पारदर्शकता वाढीस होणार मदत 

अहमदनगर (प्रतिनिधी) – विकासाची गंगोत्री व गावाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचा कारभार 15 ऑगस्ट 2017 पासून ऑनलाईन होणार आहे.
यापूर्वी अनअपडेट राहणार्‍या पंचायतींचे दप्तर ऑनलाईन प्रक्रियेमुळे ग्रामसेवकांना पूर्ण करावे लागणार आहे.
नगर जिल्ह्यात एक हजार 311 ग्रामपंचायती आहेत. त्या संदर्भात ग्रामसेवकांची 30 जून रोजी कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्यासाठी ई ग्राम-स्वाफ्ट ही कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमधील 1 ते 33 नमुन्यांची नोंद संगणीकृत होणार आहे. याशिवाय दैनंदिन कामकाज व सर्वव्यवहार ऑनलाईन होणार आहेत.
यामुळे वेळेची बचत होऊन ग्रामस्थ व पंचायत पदाधिकार्‍यांना फायदा होणार आहे. या नोंदी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांमार्फत घेण्यात येणार आहे. याशिवाय इतर सेवा नागरिकांना मिळणार आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे पारर्दशकता वाढण्यास मदत होऊन गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. तसेच रजिस्टरवर करण्यात येणार्‍या नोंदी संगणीकृत होणार असल्याने ते एकत्रितरीत्या संरक्षित ठेवता येणार आहे.
1 ते 33 नमुन्यांमध्ये गावचा अर्थसंकल्प, पुनर्वियोजन व नियमित वाटप (सुधारित अर्थसंकल्प), ग्रामपंचायत जमा खर्च व विवरण, पंचायतीची मत्ता व दायित्वे, सामान्य रोकड वही, जमा रकमांची वर्गीकृत नोंदवही, सामान्य पावती, कर आकारणी नोंदवही, कर मागणी नोंदवही कराची मागणी पावती, कर व फी बाबत पावती, किरकोळ मागणी नोंदवही, आकस्मिक खर्चाचे प्रमाणक, कर्मचारी वर्गाची सूची व वेतनश्रेणी नोंदवही, जड वस्तू संग्रह व जंगल मालमत्ता नोंदवही,
अग्रीम दिलेल्या अनामत ठेवलेल्या रकमांची नोंदवही, किरकोळ रोकड वही, कामावर असलेल्या व्यक्तींचा हजेरीपट, कामाच्या अंदाजाची नोंदवही, मोजमाप वही, कामाचे देयक, कर्मचार्‍याच्या देयकाची नोंदवही, स्थावर मालमत्ता नोंदवही, ताब्यातील रस्त्यांची नोंदवही, जमिनची नोंदवही, गुंतवणूक नोंदवही,
जमा मासिक विवरण, खर्चाचे मासिक विवरण, लेखा परीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेचे मासिक विवरण, मागासवर्गीय 15 टक्के व महिला बालकल्याण 10 टक्के करायच्या खर्चाचे मासिक विवरण, कर्जाची नोंदवही, ग्रामपंचायत लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही, प्रवास भत्ता देयक, रकमेच्या परताव्यासाठीचा आदेश व वृक्षनोंदवही आदी 1 ते 33 बाबतची अद्ययावत माहिती आता ग्रामपंचायतींना पाहता येणार आहे.
  • कामानुसारच संगणक चालकांना मानधन – 
    ऑनलाईनच्या कामांसाठी ग्रामपंचायतींकडून संगणक चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संगणक चालकांच्या कामानुसारच त्यांना मानधन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 668 पंचायतींकडे संगणक चालक आहेत. काही ठिकाणी एका चालकांकडे एकापेक्षा अधिक पंचायती आहेत. तर, काही ग्रामपंचायतींकडून नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे.
    – प्रशांत शिर्के; (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद)
  • विविध दाखले मिळणार
    मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, शौचालय दाखला, जन्म-मृत्यू नोंद, विवाह नोंदणी, नोकरी व व्यवसायासाठी ना हरकत, हयातीचा दाखला या व्यतिरिक्त विविध दाखले मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

*