ऑनलाईनच्या नावाखाली पिळवणूक थांबवा

0

अन्यथा पिचडांच्या नेतृत्वाखाली तालुकाव्यापी आंदोलन

 अकोले (प्रतिनिधी) –  केंद्र व राज्य सरकारने शासकीय व निमशासकीय अनेक बाबी या ऑनलाईन केल्या आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे पण त्यासाठी लागणारी यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. ऑनलाईनच्या नावाखाली नागरीकांची पिळवणूक गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्याने दैनंदिन उदरनिर्वाहासाठी असलेली कामे बुडवून माणसांना अकोल्यात तंबू ठोकून थांबावे लागते व त्रास सहन करावा लागतो. यामध्ये वेळीच सुधारणा न झाल्यास माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम पा. गायकर, मधुकरराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  आझाद युवा मंच चे अध्यक्ष व  राष्टवादी युुुवक चे नेेतेे विकास शेटे यांनी दिला आहे.
याबाबत अकोल्याचे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात श्री. शेटे यांनी म्हटले आहे की अकोले हा  आदिवासी, दुर्गम व डोंगराळ तालुका असुन, 195 गावांचा समावेश आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकाची काही गावे 60 ते 80 कि.मी. लांब आहेत. 195 गावे असलेल्या अकोले तालुक्यात आधार कार्ड नोंदणीची फक्त 3 अधिकृत केंद्रे आहेत. त्यामुळे या आधारकेंद्रासमोर पहाटे 5 पासुनच रांगा लागतात. शासनाने आधार कार्ड सर्वच शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक केले आहे, पण त्याची सुविधा देणारे केंद्रच उपलब्ध नसल्याने सध्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला रोजगार बुडवून पहाटेपासून रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा तर जातोच, याशिवाय रोजगार बुडाल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्यार्थ्यांना विविध शाळा, कॉलेज, अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे, शिष्यवृत्ती, विविध योजनांच्या लाभासाठी तसेच वृद्ध, निराधार महिला यांनाही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य असून यांची विशेष करून मोठी कुचंबना सुरू आहे. मोबाईल नंबर, बँक खाते, पॅन कार्ड, मालमत्ता या वा आदिंसाठी आधार लिंक करणे बंधनकारक  केले आहे. त्यातच शेतकरी कर्ज माफीचे अर्ज भरणे आहे. यासाठी शेतकर्‍यांना तासन-तास उभे राहूनही ही कामे होत नाही. त्यामध्ये नेट न चालणे तसेच वेबसाईट न उघडणे, कनेक्टीवीटी न मिळणे यामुळे सर्व सामान्य माणुस वैतागला आहे.
तसेच नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोंगरी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात पडताळणी, अधिवास दाखला, रहिवाशी दाखला असे अनेक दाखले ऑनलाईन काढावे लागतात. यासाठी सेतू केंद्राशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातच हे आधारचे काम वाढल्याने हे दाखलेही वेळेत मिळत नाही. हे दाखले काढण्यासाठी ही लोकांची मोठी आर्थिक शारीरिक, मानसिक, पिळवणूक सुरू आहे. तालुक्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ही सुविधा पुरेशी नाही. सर्व सामान्य, अशिक्षित, वृद्ध, महिला, विद्यार्थी यांना केंद्र चालकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे.

आधार केंद्राची संख्या वाढविण्यात यावी, आधार कार्ड काढणे, अपडेट करणे यासाठी तालुक्यात विभागवार कॅम्प घेण्यात यावेत, आधार कार्ड काढणे, अपडेट करणे यासाठी सुरू असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी, जे केंद्र असे करीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी, शेतकरी कर्ज माफीचे फॉर्म भरून घेण्यासाठी गावोगोवी स्वतंत्र कक्ष निर्माण करावेत, सेतू कार्यालयांनी केंद्राबाहेर प्रत्येक दाखला, आधार कार्ड, काढण्यासाठी शासनाने ठरवून दिलेली फी व कालावधी याचे फलक लावावेत, सुट्टीच्या दिवशीही ही केंद्र तुर्त सुरू ठेवावी, निराधार योजनेचे फॉर्म लाभार्थीऐवजी कामगार तलाठी यांनीच ऑनलाईन भरून द्यावेत, विविध शिष्यवृत्तीसाठी बंधनकारक करण्यात आलेले ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक शाळेत कॅम्प घेण्यात यावेत, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी, महिला, वृद्ध, शेतकरी यांना ऑनलाईन प्रक्रियेला सामोरे जावे लागते यासाठी पायाभूत सुविधा तसेच इंटरनेटचा वेग वाढविण्यात यावा अशा मागण्याही श्री. शेटे यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*